गेले वर्षभर कोरोना महामारीच्या संकटाने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. या आजारावर आता लस उपलब्ध झाली असली तरी, अजूनही हे संकट पूर्णत: टळलेले नाही. लसी व्यतिरिक्तही यावर अजून काही औषधोपचार शोधता येतात का याचीही चाचपणी अजून काही ठिकाणी सुरू आहे. इस्राईलच्या सॅनोटाइझ रिसर्च अँड डेव्हलपमेंट कॉर्प. या बायोटेक कंपनीने अशा आजारांना कारणीभूत ठरणारे विषाणुंचा प्रसार सुरुवातीच्या टप्प्यातच रोखता येण्यासाठी एका नेझल स्प्रेचा शोध लावला आहे. गेली बरीच वर्षे असे नाकाद्वारे घेण्याच्या नेझल स्प्रेचा वापर वेगवेगळ्या रोगांसाठी करण्याचा प्रयत्न अनेक कंपन्या करत आहेत. नाकातून श्वसनाद्वारे औषध थेट फुफ्फुसात पोहचले की त्याचा शरीराला ताबडतोब वापर करता येतो. कोव्हीड संसर्गाचा तर मार्गच नाकाद्वारे असल्याने हा 'एंट्री पॉइंट' सुरक्षित ठेवण्याचे काम या स्प्रेद्वारे करणे कंपनीला सयुक्तिक वाटते यात शंकाच नाही. त्यांच्या या स्प्रेला इस्राईल सरकारकडूनही नुकतीच परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता हा स्प्रे इस्राईलच्या औषधालयातून उपलब्ध होणार आहे.





