निसर्ग सौंदर्याने नटलेली प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आनंद काही औरच असतो. अशा ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपल्याला प्रसन्न आणि उल्हासित वाटते. तर या जगात काही अशीही ठिकाणे आहेत जी पाहिल्यानंतर आपल्या मनावर उदासी दाटून येते. आज आपण जगातील अशा एका विस्तृत खड्ड्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याला तिथले स्थानिक लोक नरकाचा रस्ता म्हणून ओळखतात. आता हा भला मोठा खड्डा कसा निर्माण झाला आणि त्याला हे नाव का पडले जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख नक्की वाचा.
हा नरकाचा रस्ता म्हणजेच 'गेट टू हेल' आहे तुर्कमेनिस्तान नावाच्या देशात. हा देश त्याच्या सुंदर-सुरेख गालिच्यांसाठी आणि उत्तमोत्तम घोड्यांसाठी ओळखला जातो. १९७१ साली जेव्हा आजचा तुर्कमेनिस्तान हा सोव्हिएत यूनियनचा एक भाग होता त्यावेळची ही गोष्ट आहे. सोव्हिएतने तुर्कमेनिस्तानच्या काराकुम वाळवंटात तेलसाठे शोधण्याची मोहीम चालवली होती. याच मोहिमेचा भाग म्हणून त्यांनी तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबाद पासून अवघ्या १५० मैल अंतरावर असणार्या देवरेझ या गावाबाहेरच्या मोकळ्या जागेत खोदकाम सुरू केले. काही फूट खोदताच त्या ठिकाणची वाळू आपसूकच ढासळू लागली आणि तिथे इतका मोठा खड्डा तयार झाला की खोदकामाचे पूर्ण मशीनच त्या खड्ड्यात गायब झाले. शास्त्रज्ञांना जिथे तेलाचा साठा सापडण्याची शंका होती, प्रत्यक्षात तो नैसर्गिक वायूचा साठ निघाला. या साठ्यातून मोठ्या प्रमाणात मिथेन वायूची गळती सुरू झाली. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मिथेन वायूची गळती रोखणे आवश्यक होते. कारण मिथेन वायू हवेत पसरू लागला की हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण कमीकमी होऊ लागते. हवेतील ऑक्सिजन जितका मानवासाठी गरजेचा आहे तितकाच तो जंगली प्राण्यांसाठीसुद्धा गरजेचा आहे.


