आपल्यापैकी प्रत्येकाचं हाड कधी ना कधी फ्रॅक्चर झालेलं असतंच. सायकल शिकताना कधी वर्मी इजा होते, कधी कुठे पायच घसरतो, कधी बाईकवरूनच पडतो, कधी माळ्यावरची सफाई करताना काहीतरी अपघात होतो. थोडक्यात, कारण काहीही असो, आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाला या फ्रॅक्चरचा अनुभव मिळतोच मिळतो!!
तसं पाहायचं तर फ्रॅक्चर म्हणजे हाड मोडणे हा बऱ्यापैकी सामान्य असलेला प्रकार आहे. सर्वसाधारण मनुष्याला आयुष्यात सरासरी दोन वेळा फ्रॅक्चरला सामोरे जावे लागते. जेव्हा हाडाला त्या हाडापेक्षा जास्त शक्तिशाली वस्तूमुळे इजा होते तेव्हा हाड मोडते. फ्रॅक्चर होण्याचा धोका वयाबरोबर वाढत जातो. खरेतर लहान मुलांमध्ये खेळताना पडल्यामुळे अनेक वेळा फ्रॅक्चर होत असते. परंतु लहान मुलांमध्ये होणारी फ्रॅक्चर्स कमी गुंतागुंतीची असतात. जसजसे वय वाढत जाते तसतशी हाडे ठिसूळ होत जातात आणि त्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यताही वाढते.










