डेड फोटोग्राफी: मृत व्यक्तींचे फोटो काढण्याची रुढी कुठे आणि कशी पाळली जायची?

लिस्टिकल
 डेड फोटोग्राफी: मृत व्यक्तींचे फोटो काढण्याची रुढी कुठे आणि कशी पाळली जायची?

मृत्यू पावलेल्या लोकांच्या आठवणी जपून ठेवण्याच्या अनेक पद्धती जगभर आढळतात. काही संस्कृतींमध्ये तर मेलेल्या व्यक्तीला पुरलं किंवा जाळलं जात नाही, तर त्यांची प्रेते सांभाळून ठेवली जातात. मेक्सिकोसारख्या देशात तर दरवर्षी मृत्यूचा सोहळा साजरा केला जातो. याबद्दल आम्ही इथं आधी लिहिलं आहे:

लेन्सकथा : फोटोंच्या माध्यमातून केलेलं जीवन- मृत्यूच्या फेऱ्याचं, संस्कृतीच्या खुणांचं फोटो डॉक्युमेंटेशन!!

जगभरात अशा अनेक विचित्र प्रथा परंपरा असल्या तरी तुम्ही कधी मेलेल्या माणसाच्या फोटो सेशनबद्दल नक्कीच ऐकलं नसणार. पण हे खरोखर घडत होतं. ऐकून आश्चर्य वाटलं ना? आजच्या लेखातून आपण डेड फोटोग्राफी किंवा पोस्ट मॉर्टेम फोटोग्राफीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

तशी ही पद्धत फोटोग्राफीच्याही अगोदरची आहे. इंग्लंडच्या इतिहासात राणी व्हिक्टोरियाच्या कालखंडाला व्हिक्टोरियन युग म्हणतात. या काळात मेलेल्या व्यक्तींचं चित्र काढण्याची पद्धत सगळीकडे प्रचलित होती. पुढे जाऊन जेव्हा फोटोग्राफीचं तंत्रज्ञान आलं तेव्हा चित्र जाऊन लोक मेलेल्या माणसांचे फोटो काढू लागले. काही वेळा तर या मेलेल्या व्यक्तींसोबत त्यांच्या जवळचे लोक फोटो काढायचे. आजच्या काळात हे विचित्र आणि आक्षेपार्ह वाटू शकतं, पण त्याकाळी हे सर्रास चालायचं

फोटोग्राफीचं तंत्र विकसित व्हायच्या अगोदर चित्रकारांना बोलवून मेलेल्या व्यक्तीचं चित्र काढलं जायचं. मृत व्यक्तीला चांगले कपडे आणि दागिने घालून झोपवलं जायचं आणि त्यांचं चित्र रेखाटलं जायचं. चित्र काढताना त्या व्यक्तीचे डोळे उघडे दाखवले जायचे. हे उघडे डोळे म्हणजे त्या व्यक्तींमध्ये जणू अजूनही प्राण आहेत हे सुचवणारे असायचे. चित्रकारांना अत्यंत जलदगतीने चित्र पूर्ण करावं लागायचं, कारण मृत शरीराचं विघटन होण्यास सुरुवात झालेली असायची.

कालांतराने १९३९ सालच्या दरम्यान फोटोग्राफीचं तंत्र आल्यानंतर चित्रकारांची जागा फोटोग्राफर्सनी घेतली. मृत व्यक्तीचा फोटो घेण्यापूर्वीही तयारी केली जायची. वेशभूषेपासून ते त्यांचा मेकअपपर्यंतच्या सर्व गोष्टींवर बारकाईने काम केलं जायचं. डोळे खोल गेले असतील तर रंगाचा वापर करून त्वचा तजेलदार दिसेल अशी तजवीज केली जायची. शरीरात प्राण नसले तरी मृत व्यक्ती जिवंत असल्याचा भास व्हावा म्हणून सगळा खटाटोप केला जायचा.

जर लहान मुलाचा मृत्यू झाला असेल तर आई किंवा वडील त्याला जवळ घेऊन फोटो काढायचे. याखेरीज मुलाच्या आवडत्या खेळण्यांना त्याच्या अवतीभवती विखरून ठेवलं जायचं. वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या अवतीभोवती त्यांचे नातेवाईक जमायचे. त्यांना छान सजवलं जायचं. पुढे जाऊन तर फोटो काढल्यानंतर त्यांच्या मिटलेल्या पापण्यांवर डोळे रंगवले जायचे.

डेड फोटोग्राफी किंवा नेमकं म्हणायचं झालं तर पोस्टमॉर्टेम फोटोग्राफीच्या सुवर्णकाळात लोक जिवंतपणी कधीच फोटो काढत नसत. मृत व्यक्तीचा फोटो हा त्याच्या जीवनातला पहिला आणि शेवटचा फोटो असायचा. याचं एक कारण म्हणजे त्याकाळी आजच्यासारखे फोटो स्टुडीओ पावलापावलांवर उपलब्ध नव्हते. याखेरीज फोटोग्राफी महागडं प्रकरण होतं. त्यामुळे ही चैन आयुष्यात फक्त एकदाच जमायची.

 

आणि नेमक्या याच कारणाने डेड फोटोग्राफीचा अंत झाला. १९२० सालापर्यंत लोक या पद्धतीने आपल्या जवळच्या लोकांच्या आठवणी जतन करत, पण पुढे जाऊन फोटोग्राफीचं तंत्र स्वस्त झालं. त्यामुळे लोक आपल्या हयातीतच आपले फोटो काढून ठेऊ लागले. परिणामी मृत्युनंतरच्या फोटोची गरजच संपली. गरज संपल्यावर शोधही संपतोच.

तर अशा प्रकारे आधी चित्र आणि नंतर फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांनी आपल्या जवळच्या लोकांच्या आठवणी जपल्या. जाता जाता त्या काळातल्या काही मोजक्या फोटोग्राफ्सचे नमुने आम्ही वाचकांपुढे ठेवत आहोत. हे फोटो तुम्हाला विचलित करू शकतात.