मानवी शरीर हे एक वेगळंच मशीन आहे. शरीराच्या आत कायकाय घडते आणि त्याचा शरीरातील अवयवांवर व त्यांच्या कार्यावर काय बरावाईट परिणाम होतो हे सामान्य माणसाच्या आकलनाबाहेरचे आहे. उदाहरणच द्यायचे तर शरीरातील विसर्जन संस्था. हिच्या कामात थोडी जरी गडबड झाली तरी त्याचे पडसाद लगेच शरीरावर उमटतात. हातापायांवर, डोळ्यांखाली आलेली सूज, मूत्रविसर्जन करताना होणारी जळजळ, लघवी करण्याआधी, करताना किंवा त्यानंतर होणार्या वेदना, लघवीवाटे होणारा रक्तस्राव ही या बिघाडाची लक्षणे आहेत. मात्र केवळ या लक्षणांवरून आजार किती गंभीर आहे याची नेमकी कल्पना येत नाही. त्यासाठी युरीन टेस्ट केली जाते. वैद्यकीय भाषेत याला युरीन ॲनालिसिस असेही म्हणतात. मधुमेह, किडनीचे विकार आणि मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग अशा विकारांसाठी मुख्यतः युरीन टेस्ट केली जाते. आज या युरीन टेस्टचे महत्त्व, पद्धत, ती कधी करावी आणि त्यामधून काय समजते हे जाणून घेऊयात.
मूत्रतपासणी करताना लघवीचे प्रमाण, तिचे स्वरूप, आणि संहती(कॉन्सन्ट्रेशन) बघितली जाते. या टेस्टचे निष्कर्ष नॉर्मल नसतील तर हे काहीतरी बिघाड झाल्याचे किंवा एखादा आजार असल्याचे दर्शवते. उदाहरणार्थ मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग झाला असेल तर लघवीचा रंग काहीसा धुरकट दिसतो, लघवीमध्ये प्रोटिन्सची पातळी वाढलेली दिसली तर ते किडनीच्या विकाराचे चिन्ह आहे. मूत्रतपासणीचे निष्कर्ष जर अॅबनॉर्मल असतील तर अनेकदा विकाराचे मूळ शोधण्यासाठी डॉक्टर अतिरिक्त चाचण्या करायला सांगतात







