शिसं घातक असल्याचं मोठं कारण म्हणजे ते शरीरातील उत्प्रेरकांच्या कामात अडथळा आणतं. या कारणाने मान, कंबर, गुढगे यांचं दुखणं सुरु होतं. शरीरातील महत्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होऊन उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. स्त्री आणि पुरुष दोघांमधली प्रजननक्षमता कमी होत जाते. रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीवर प्रतिबंध लागतो. मेंदूच्या कार्यात अडथळे येऊन कधीही न भरून निघणारं नुकसान होतं.
मेंदूचं एकूण कार्य हे मेंदूच्या पेशींचा एकमेकांशी होणाऱ्या संपर्कातून होत असतं. शिसं जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचतं तेव्हा दोन पेशींच्या संपर्कात अडथळा यायला सुरुवात होते.
तसं बघायला गेलं तर शिसं सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी घातक आहे, पण तरुणांसाठी ते सर्वात जास्त घातक आहे, कारण तरुण वयात मेंदूची वाढ होत असते. या वयात होणारे बदल हे जन्मभर राहतात. मेंदूच्या कार्यातील अडचणींमुळे मेंदूची योग्य वाढ होत नाही. अपुऱ्या वाढीमुळे मुलांचा बुध्यांक कमी होतो, तसेच शैक्षणिक प्रगतीवर त्याचा परिणाम दिसून येतो.