गेले वर्षभर मुलांच्या शिक्षणात जो खंड पडला आहे त्यामुळे खूप चिंता व्यक्त होत आहे. शाळा बंद, खेळणे बंद मुलं करणार काय हा प्रश्न अनेकांना भेडसावत होता. ऑनलाईन शाळेमुळे थोडाफार हा प्रश्न सुटला. तरीही शाळेसारखे शिकणे ऑनलाईन शाळेत नक्कीच होत नाही. भरपूर वेळ असल्यामुळे मुलं बराच वेळ इंटरनेटवर बसून काहीतरी बघत राहतात. याच वेळेचा खूप चांगला उपयोग औरंगाबादच्या एका मुलीने केला आहे. दीक्षा शिंदे असे तिचे नाव आहे आणि तिची नासाच्या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलवर पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली आहे. इतक्या लहान वयात तिची कामगिरी पाहून दीक्षाचे कौतुक होत आहे.
दीक्षा शिंदे ही औरंगाबादमध्ये १०व्या इयत्तेत आहे. ती चौदा वर्षांची आहे. तिचा शोधनिबंध 'We live in Black Hole?' इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंजिनीअरिंग रिसर्चने या वर्षी मे मध्ये स्वीकारला होता. जूनमध्ये तिची नासाच्या २०२१ एमएसआय फेलोशिप व्हर्च्युअल पॅनेलसाठी पॅनेलिस्ट म्हणून निवड झाली.


