कोलंबसचे थडगे, २४ तासांत घटस्फोट, सर्वप्रथम गुलामगिरी नष्ट करणारा देश.. आणखी काय काय दडलंय हैतीमध्ये?? जाणून घ्या हैतीची १५ वैशिष्ट्ये!!

लिस्टिकल
कोलंबसचे थडगे, २४ तासांत घटस्फोट, सर्वप्रथम गुलामगिरी नष्ट करणारा देश.. आणखी काय काय दडलंय हैतीमध्ये?? जाणून घ्या हैतीची १५  वैशिष्ट्ये!!

कॅरीबियन द्वीप समूहात हैती नावाचा देश आहे. १४ ऑगस्टच्या सकाळी हैतीला ७.५ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा बसला. आधीच राजकीय अस्थिरतेने जर्जर झालेल्या या देशावर प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. या भूकंपात सुमारे १३०० हून अधिक जीवितहानी झालेली असून तिथे आपत्तीकार्य अजूनही सुरूच आहे. हा आकडा अजूनही वाढेल अशी शंका आहे.

दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या या देशाला समृद्ध ऐतिहासिक परंपरा आणि वारसा आहे. सतत येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचं इथं नवल नाही, तरीही या सगळ्या विपरीत परिस्थितीतून हैतीने जागतिक पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नैसर्गिक आपत्तीशी सदैव दोन हात करत पुन्हा त्याच आशेने उभ्या राहणाऱ्या हैतीबद्दलची अधिक माहिती देणारा हा लेख आवर्जून वाचवा असा आहे.

१. हैती बेटावर फार फार पूर्वीपासून तैनो जमातीच्या लोकांचे वास्तव्य आहे. जगसफारीवर निघालेला कोलंबस १४९२ रोजी या बेटावर पोहोचला आणि त्याने या बेटाला स्पॅनिश आईल(aisle) म्हणजेच स्पॅनिश गल्ली हे नाव दिले. कोलंबसचे निधन इथेच झाले. हैतीच्या पोर्ट-ओ-प्रिन्स या राजधानीच्या शहरात कोलंबसचे एक उंच स्मारकही उभारण्यात आले आहे. इथल्या सँटा मारिया कबरस्तानात कोलंबसचे दफन करण्यात आले होते. इतर देशाप्रमाणेच कोलंबसचे या बेटावरील आगमन इथल्या स्थानिक लोकांसाठी एक आपत्तीच ठरली. आजही या लोकांना कोलंबसचे आगमन ही आपल्या बेटावरील एक अनिष्ट घटना होती असेच वाटते.

२. या देशात उंच पर्वतरांगांची संख्या खूप आहे. इथल्या पर्वत रंगांची उंची ८००० फूटांपेक्षाही जास्त आहे. इथले स्थानिक लोक आपल्या या बेटाला डोंगरांचा प्रदेश म्हणतात. इतर कॅरिबियन देशाच्या तुलनेत हैतीला मिळालेले हे विशेषण अगदीच सार्थ ठरते.
३. पाश्चिमात्य जगतात गुलामगिरीसारख्या अघोरी प्रथेचे किती मोठे प्रस्थ होते हे तर आपण सर्वांना माहित आहे. गुलामगिरीसारख्या अमानुष प्रथेचे उच्चाटन करणारा हैती हा पहिला देश आहे. हैतीनंतर ६५ वर्षांनी अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बंद केली. म्हणजे हैती याबाबत अमेरिकेपेक्षाही ६५ वर्षांनी पुढे होता. मानवी इतिहासात वांशिक समता प्रस्थापित करण्याचे यश हैतीच्याच नावावर नोंदले गेले आहे.
४. हैतीचा धर्म ही एक अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. वुडू हा हैतीचा राष्ट्रीय धर्म आहे आणि स्थानिक लोक अपार निष्ठेने आपल्या या धर्माचे पालन करतात. हैतीचे माजी राष्ट्रपती फ्रान्सिस डूवाली यांना तर आपण वुडू असल्याचा फारच अभिमान होता.

५. हैतीमध्ये मोठ्या तीव्रतेचे भूकंप नेहमीच जाणवतात. २०१० मध्येही इथे मोठा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यात सुमारे तीन लाख लोक मृत्यूमुखी पडले होते, एक कोटीहून अधिक लोक बेघर झाले होते. या लोकांना सर्वात जास्त गरज होती ती निवारा आणि रुग्णालयांची. यासाठी हैतीमध्ये युनिव्हर्सिटेर दि मिरेबालीस हे एक मोठे हॉस्पिटल उभारण्यात आले. हे हॉस्पिटल संपूर्णत: सौर उर्जेवर चालते. एवढे मोठे हॉस्पिटल सौर उर्जेवर चालवणारा हैती हा पहिलाच देश आहे.

६. या संपूर्ण देशात भरपूर गुहा चित्रे आहेत आणि अजूनही ती सुस्थितीत आहे. इथल्या स्थानिक तैनो जमातीच्या लोकांनीच ही गुहा चित्रे रेखाटली आहेत. ही सगळी गुहाचित्रे आज इथल्या पर्यटनाचे आकर्षण केंद्रे बनली आहेत. या गुहेतील अनेक चिन्हांना हैतीने राष्ट्रीय चिन्हांचा दर्जा दिली आहे.
७. जगातील सन्मानीय पुरस्कारांपैकी एक पुरस्कार म्हणजे ग्रॅमी ॲवॉर्ड. संगीत क्षेत्रात जागतिक पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना हा पुरस्कार दिला जातो. हैती वंशाच्या वायक्लिफ जीन यांना हा पुरस्कार मिळाला होता. वायक्लिफला आपण मूळचे हैती असल्याचा खूपच अभिमान आहे. याच आधारावर त्याने २०१० मध्ये हैतीच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अर्ज केला होता, मात्र त्याचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. याच वर्षी झालेल्या भूकंपात हैतीला जबर फटका बसला होता तेव्हा वायक्लिफने आपल्या चॅरिटीच्या माध्यमातून हैतीसाठी प्रचंड मोठी मदत जमा केली होती. तरीही त्याला हैतीचा राष्ट्राध्यक्ष मात्र होता आले नाही.
८. फ्रेंच आणि क्रिओल या दोन हैतीच्या अधिकृत भाषा आहेत. फ्रेंच ही त्यांची राष्ट्रभाषा असली तरी ९०% हैती लोक आपली क्रिओल हीच भाषा बोलतात. शेवटी १९८७ मध्ये या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला.

९. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण कोंबड्यांच्या झुंजीला हैतीत अधिकृत खेळाचा दर्जा दिला आहे. अमेरिकेतील अनेक प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी हैतीच्या या राष्ट्रीय खेळाला विरोध केला असला तरी हैतीने कोंबड्यांच्या झुंजीची आपली परंपरा सोडलेली नाही. कोंबड्यांना राग यावा आणि त्यांनी एकमेकांविरोधात आक्रमक व्हावे म्हणून त्यांना कच्चे मांस आणि रममध्ये बुडवलेली लाल मिरची खायला घातली जाते. या झुंजीत ज्याचा कोंबडा जिंकेल त्याला ७०डॉलर्सचे बक्षीस दिले जाते. ही रक्कम हैतीतील मासिक वेतनाहून ८०टक्क्यांनी जास्त आहे. यामुळे कोंबड्याचे मालक मालामाल होतात.

 

१०. हैतीच्या ‘बॉनेट ए लीएव्हक्यू’ या सर्वात उंच पर्वतावर “द सिटाडेल” नावाचा प्रचंड मोठा किल्ला आहे. जगभरातील पर्यटकांसाठी हा किल्ला आकर्षणाचे केंद्र आहे. हा किल्ला म्हणजे हैतीच्या स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. पाश्चिमात्य देशातील सर्वात उंचावर वसलेला किल्ला अशीही या किल्ल्याची ख्याती आहे.

११. जगभरातील सगळ्या देशात घटस्फोट ही खूपच किचकट प्रक्रिया आहे. पण घटस्फोटाची ही प्रक्रिया अत्यंत सोपी करण्यासाठी हैतीने १९७० आपल्या देशात एक नवा कायदा आणला. या कायद्यानुसार ज्या जोडप्यांना घटस्फोट घ्यायचा आहे त्यांच्यापैकी कोणी एक जरी जोडीदार न्यायालयात हजर असेल तरीही त्याला घटस्फोट मंजूर केला जातो. हैतीच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी हा कायदा निर्माण करण्यात आला असे म्हटले जाते. मात्र असा झटपट २४ तासांतला घटस्फोट हैती आणि डॉमनिक रिपब्लिकच्या नागरिकांना मिळत नाही.

१२. हैतीमधल्या लोकांच्या रक्तातच कला भिनलेली आहे असे म्हटले जाते. हैतीची चित्रकला तर खूपच प्रसिद्ध आहे, मुख्यत: या चित्रकलेतील धाडसी विषय, आकर्षक रंगसंगती आणि प्रतिके ही त्याची बलस्थाने आहेत. अमेरिकेकडून आणलेल्या टपटप बसेसवर हैतीच्या कलाकारांनी अशी काही चित्रे रंगवली आहेत की संपूर्ण हैतीच रंगेबिरंगी वाटते. या बसेसमुळे हैतीतील रस्तेही रंगीबेरंगी वाटतात. म्हणूनच हा देश रंगीत देश म्हणूनही ओळखला जातो.

१३. हैतीच्या चलनाला ‘गार्डे’ म्हणून ओळखले जाते. एका फळभाजीच्या नावावरून हैतीच्या चलनाला हे नाव मिळाले आहे. भोपळ्यासारखे दिसणारे गार्ड हे इथले प्रमुख अन्न आहे. एकदा का हे फळ वाळले की त्याच्या कवचाचा उपयोग पाणी भरून ठेवण्यासाठी केला जातो. १८०७ पर्यंत हैतीमध्ये हा गार्ड हेच एक चलन होते. म्हणूनच आताचे चलन या गार्डच्या नावावरून ओळखले जाते.

१४. हैतीमध्ये वनस्पतींच्या ५,६०० प्रकारच्या प्रजाती आढळतात. समुद्रसपाटीपासून ते उंच पर्वत रांगांपर्यंत विविध वनस्पती आणि प्राणी इथे आढळतात. कॅरिबियन देशातील इतर देशांच्या तुलनेत हैतीमध्ये जीवसृष्टीची विविधता मोठ्या प्रमाणात आढळून येते. जगभरात दुर्मिळ असलेले अनेक सस्तनप्राणी हैतीमध्ये आढळून येतात. हैतियन सालेनेडोन ही इथल्या उंदरांची एक विशिष्ट प्रजाती आहे, जी हैती शिवाय इतरत्र कुठेच आढळत नाही.

१५. हैतीला समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा आहे. म्हणूनच हैती पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण केंद्र आहे. पर्यटन हाच इथला प्रमुख व्यवसाय आहे. एकट्या पर्यटनातूनच या देशाला वार्षिक २० कोटी डॉलर्स इतके उत्पन्न मिळते. अलीकडच्या काही वर्षात नैसर्गिक आपत्ती आणि राजकीय अस्थिरतेने इथल्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. २०१० सालच्या भूकंपामुळे संपूर्ण उध्वस्त झालेला हैती पुन्हा भरारी घेईल अशी आशा होती आणि हैतीने ते प्रत्यक्षात करूनही दाखवले होते. इतक्यात त्यांच्यावर पुन्हा एकदा निसर्गाची अवकृअपा झाली आहे.

आपल्या संपन्न संस्कृतीच्या उदरात आणि समृध्द निसर्गातच हैतीला पुन्हा एकदा उभे राहण्याची जिद्द आणि आशावाद गवसेल, अशी प्रार्थना करूया.

मेघश्री श्रेष्ठी