'ओल्ड वाईन इन न्यू बॉटल' अशी एक म्हण आहे. एखादी गोष्ट सादर करताना ती जर नव्या रूपात, हटके अंदाजात पेश केली तर लोकांचं लक्ष वेधून घेते. बाजारपेठेत अनेकदा कंपन्यांनाही हा प्रयोग करावा लागतो. अगदी एस्टॅब्लिश्ड असलेले भिडूही अधूनमधून ब्रँडला ग्राहकांशी जोडून घेण्यासाठी रिब्रॅंडिंगचा खेळ खेळतात. काय आहे हे रिब्रॅंडिंग?
एखादा ब्रँड आधी जोरात चालतो. त्याचा लोगो, स्लोगन, टॅगलाईन लोकांच्या मनाला भिडतात. त्या ब्रँडची एक इमेज तयार होते. जसं ऍपलची उत्पादनं म्हटली की त्यांचं स्लीक डिझाईन डोळ्यांसमोर येतं, तसंच एक घास खाल्लेलं सफरचंदही. नाइके कंपनीचा लोगो गतीचा आभास निर्माण करतो. पण हे एवढ्यातच संपत नाही.
कधीकधी काही दिवसांनी लोकांना त्यात तोचतोचपणा जाणवायला लागतो. ग्राहक तसा महाचंचल प्राणी! त्याला सतत काहीतरी नवं लागतं. त्याच्या आवडीनिवडी बदलत राहतात. दहावीस वर्षांपूर्वी जे अगदी हिट होतं, ते आज तितकं चालत नाही असंही चित्र दिसतं. त्यामुळे बाजारपेठेचा कल ओळखून त्याप्रमाणे आपल्या ब्रँडचा चेहरामोहरा बदलणं आवश्यक ठरतं. लोगोत ताजेपणा आणणं हा यामागचा मुख्य उद्देश. थोडक्यात रिब्रँडींगचा एक भाग म्हणजे लोगोत बदल करणं. हा प्रयोग अनेकदा यशस्वी होतो, कारण तो मुख्यतः नव्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून केलेला असतो. नवी पिढी उत्पादनासोबत स्वतःला जोडून घेते आणि साहजिकच सेल्सचे आकडे वाढतात.
आता हा लोगो कधी बदलला जातो?
कंपनी एखाद्या क्षेत्रात नव्याने प्रवेश करत असल्यास,
कंपनीला तिच्या क्षेत्रात अनेक स्पर्धक निर्माण झाल्यास त्यांच्यापेक्षा वेगळं उठून दिसण्यासाठी,
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश करत असल्यास इतर देशांच्या संस्कृतींशी जुळवून घेण्यासाठी.
उदाहरणार्थ विविध आकार, रंग यांचा वेगवेगळ्या देशांत, तिथल्या संस्कृतींनुसार वेगवेगळा अर्थ असतो. अशा वेळी आपला लोगो वादग्रस्त ठरू नये म्हणून कंपन्या तो बदलतात, म्हणजे रिब्रॅंडिंग करतात.कोणत्याही कारणाने कंपनीची प्रतिमा मलिन झाल्यास,
आधी म्हटल्याप्रमाणे नवीन पिढीशी जोडून घेण्यासाठी, ब्रँडमध्ये ताजेपणा आणि आधुनिकता आणण्यास,
व्यवसायाच्या मालकीत बदल झाल्यास : म्हणजे दोन कंपन्या एकत्र (मर्ज) झाल्यास किंवा एका कंपनीने दुसरी कंपनी विकत घेतल्यास,
रिब्रॅंडिंग करून यशस्वी झालेल्या काही ब्रॅंड्सची उदाहरणं बघू.
















