हॅकिंग म्हणजे काय? टेक्निकली याचा अर्थ खूप क्लिष्ट आहे, पण साध्या भाषेत सांगायचे तर सरळसरळ दुसऱ्याच्या घरात किंवा खरंतर संगणकात घुसून चोरी करणे. संगणकीय भाषेत सांगायचे झाल्यास विनापरवानगी एखादे अकाऊंटचे पासवर्ड मिळवून लॉगिन करणे किंवा अनधिकृतपणे वेबसाईटवरची माहिती मिळवून त्याचा गैरवापर करणे. हे हॅकिंग कुणीही उठून करु शकत नाही. यासाठी तांत्रिक तज्ञ असावे लागते. पण याच हॅकिंगमध्ये अमेरिकेच्या १५ वर्षाच्या एका मुलाने असा काही कारनामा केला की त्या मुलाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. त्याच्या आयुष्यात इतके चढ-उतार आले की शेवटी त्याला स्वतःचा जीव द्यावा लागला. कोण आहे हा मुलगा?त्याची संपूर्ण कहाणी शेवटपर्यंत नक्की वाचा.
हा १५ वर्षाच्या हॅकर जोनाथन जेम्स. याने केवळ गंमत म्हणून नासाची यंत्रणा हॅक केली. यामुळे नासाला अनेक दिवस आपले काम थांबवावे लागले होते. ही गोष्ट १९९९ सालची आहे. त्यावेळी अमेरिकेत संगणक आणि इंटरनेटचा ट्रेंड सुरू झाला होता. सर्व तरुणांना त्यावेळी इंटरनेटवर काम करणे खूप भारी वाटायचं. इंटरनेटचा उपयोग करून काय करता येईल यासाठी अनेकजण नवनवीन प्रयोग करायचे. जेम्स त्यावेळी फक्त १५ वर्षांचा होता. त्याला संगणकाचे जग समजून घ्यायचे होते. वडील कॉम्प्युटर प्रोग्रामर असल्यामुळे त्याला ७व्या वर्षापासून कॉम्प्युटरचे कुतूहल होते. या नवनवीन गोष्टी तो खूप चटकन शिकायचा. हळूहळू तो हॅकिंगकडेही वळला. जेम्सला हॅकिंग एक थ्रील वाटायचे. त्यासाठी त्याने कॉम्रेड हे युझरनेम घेतले होते. या नावाने जेम्सने हॅकिंगच्या जगात प्रवेश केला आणि हॅकिंगचे प्रोग्रॅम बनवायला सुरुवात केली. ज्या वयात जेम्सचे समवयस्क खेळताना उड्या मारायचे त्या वयात जेम्स कॉम्प्युटरसमोर तासनतास बसून कोडिंग करायचा.
हळुहळू हॅकिंगमध्ये जेम्सचा चांगला हात बसला. छोटे प्रोग्राम बनवून तो हॅकिंग सहज करायचा, पण त्याला काहीतरी मोठे करून खळबळ उडवून द्यायची होती. म्हणून त्याने देशातील सर्वात सुरक्षित नासाची संगणक प्रणाली हॅक करण्याचा विचार केला. जेम्सने असा प्रोग्राम बनवला ज्याद्वारे तो नासाच्या सुरक्षित यंत्रणा पाहू शकतो. त्यासाठी त्याने स्थानिक शाळा आणि स्टोअरमध्ये तो प्रोग्राम रन म्हणजे चालवून पहिला. तो यशस्वी झाल्यावर जेम्सने हा प्रोग्राम थेट नासाच्या संगणकावर पाठवला. त्यामुळे नासाची सिस्टीम हॅक झाली. जेम्स फक्त सिस्टम हॅक करण्यापर्यंत थांबला नाही. त्याने नासाच्या यंत्रणेतील एक सॉफ्टवेअरही चोरले. असे म्हटले जाते की त्या सॉफ्टवेअरची किंमत सुमारे $1.7 दशलक्ष होती. नंतर जेम्सने इंटरनेशनल स्पेस स्टेशनचा सोर्स कोड ही हॅक केला. जेम्स कळत-नकळत मोठा गुन्हा करत होता, त्याला पुढे काय होणार याची कल्पना नव्हती.

