आपल्या मुलांचे हट्ट जगावेगळे असतील तर प्रत्येक आई-वडिलांना चिंता ही वाटतेच. जगावेगळे हट्ट असणारी मुलेच काही तरी जगावेगळे बदल घडवून आणू शकतात हे जरी खरे असले तरी असे हट्ट पुरवताना आणि त्यांचे परिणाम भोगताना अक्षरश: आई-वडिलांच्या नाकी नऊ येतात. याचा पुरावा हवा असेल तर हा लेख नक्की वाचा.
ही गोष्ट आहे १९९८ सालची. आजच्या प्रमाणे त्याकाळी मुलांच्या हाताशी इंटरनेट नावाचा जादूचा दिवा नव्हता. त्यामुळे मुलांना आपल्या उत्सुकतेची भूक भागवायची असल्यास दोनच पर्याय उपलब्ध होते- एक तर पालकांना आणि शिक्षकांना प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडणे किंवा त्या त्या विषयावरील वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली पुस्तके आणून ती वाचून काढणे.
तर डेव्हिड हाही एक असाच पौंगडावस्थेतील मुलगा होता. त्याला रासायनिक प्रक्रिया आणि त्याच्या प्रयोगांबद्दल खूप उत्सुकता होती. डेव्हिडचे आई-बाबा त्याच्या लहानपणीच विभक्त झाले होते. त्याची आई बिचारी माहेरच्या आधारावर कसाबसा आपला आणि डेव्हिडचा खर्च सांभाळत होती. लहानपणापासून विविध प्रयोगात रमलेला डेव्हिड अबोल आणि शांत होता. तो स्वतःच्याच तंद्रीत मग्न असे. डेव्हिडला विविध प्रयोग करण्याची असलेली आवड पाहून त्याच्या आजोबांनी त्याला रसायन शास्त्रातील साध्यासोल्या प्रयोगकृतींचे 'गोल्डन बुक ऑफ केमिस्ट्री एक्स्परिमेंट्स' नावाचे एक पुस्तक आणून दिले.




