म्युझियममध्ये आपल्याला कोणत्याही गोष्टीला हात लाऊ देत नाहीत. एकतर लोक वस्तू खराब करतात किंवा मग सतत हात लावल्याने त्या वस्तूची झीजपण होते. आपल्याकडे नाही का, लोकांनी चांगदेवाच्या भिंतीचे तुकडे खरवडून देवघरात ठेवायला नेले म्हणून त्या भिंतीला हात लावू देत नाहीत आणि विठ्ठलाच्या पायावर सतत डोकं ठेवल्यानं पायाची झीज झाली म्हणून आता विठ्ठलाचं ही मुखदर्शनच मिळतं. अशा परिस्थितीत तुम्हाला एका म्युझियममध्ये चक्क सोन्याचं टॉयलेट आहे आणि ते वापरायला ही मिळेल असं कळलं तर?
तर हे १८कॅरेट सोन्यापासून बनलेलं आणि वापरण्यायोग्य असं टॉयलेट आहे न्यूयॉर्कच्या गग्गनहेम(Guggenheim) म्युझियम मध्ये.. याचा कर्ता करविता आहे मॉरिझिओ कॅटलन. त्याच्या आणि म्युझियमच्या क्युरेटर नॅन्सी स्पेक्टर यांचं म्हणणं आहे की, " ही ९९ टक्के लोकांसाठी असलेली १% कला आहे". या टॉयलेटला नांवही मोठं गमतीशीर दिलंय- "अमेरिका". तर या अमेरिकेवर शी-शू करायची संधी या गग्गनहेम म्युझियमने या १५ सप्टेंबरपासून लोकांना उपलब्ध करून दिलीय आणि ती संधी घेण्यासाठी लोक रांगा लाऊन उभेही असतात. म्हणजे पाहा, आजूबाजूला इतर टॉयलेट्स असतानासुद्धा लोक इथं दोन-दोन तास रांगा लाऊन उभे असतात, मग येणारा-जाणारा इथे का रांग लागलीय म्हणून आश्चर्यानं विचारतो, आणि मग गार्ड नाहीतर रांगेतले लोक सांगतात,"टॉयलेट वापरण्यासाठी"!!
इतर टॉयलेट सारखं हे सुद्धा दिवसातून बरेच वेळा साफ करावं लागतं आणि अर्थातच सोन्याचं असल्यानं त्याची विशेष काळजी घ्यावी लागतेय. त्यासाठी मग गरम वाफेच्या फवारे आणि पुसण्यासाठी स्पेशल कपडे याची तरतूद केली गेलीय. आधीपासून या सोन्याच्या संडासाच्या भांड्याची इतकी जाहिरात झाली होती, की ज्या दिवशी हे जनतेसाठी खुलं केलं, त्या दिवशी ते अतिवापरानं ब्लॉकही झालं होतं. अर्थातच मग साफ करणार्या टीमला बोलावणी गेली होती.
असो. गग्गनहेम म्युझियममधल्या या विचित्र वस्तूचं नक्की वजन आणि किंमत त्यांनी अजून तरी जाहीर केली नाही. पण वापरलेले दागिने मोडताना सोनार घट धरतो म्हणून काळजी करणाऱ्या आपल्यासारख्यांचा हे सोन्याचं टॉयलेट बघून जीव थोडा-थोडा होतो, नाही??
