ब्रिटिशांनी नाही म्हटलं तरी काही कामं लै भारी करून ठेवली आहेत राव.. त्यांचं घटनांचं नोंदी ठेवणं हे त्यापैकीच एक भारी काम. ब्रिटिश पाथे नावाच्या एका ब्रिटिश कंपनीनं तेव्हाच्या बातम्या आणि डॉक्युमेंट्रीज बनवल्या आहेत. यात भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेल्या काही घटनांचं व्हिडिओ शूटिंगही आहे.
हे चॅनेल धुंडाळताना आज आम्हांला १९४६च्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ मिळालाय. महाराष्ट्रात गणपती आणि गणपती म्हटलं की विसर्जनाची मिरवणूक या दोन महत्वाच्या गोष्टी. याचाच जर जुना व्हिडिओ पाहायला मिळाला तर मग काय!!

व्हिडिओची सुरवात हँगिंग गार्डनमधून दिसणाऱ्या पूर्ण गिरगांव चौपाटीच्या दृश्यानं. मग डोक्यावरून पाटावर विराजमान झालेल्या गणूरायाला घेऊन जाणारे लोक दिसतात. विजार-लेंगा, धोतर आणि हाफ चड्डीतली साधी माणसं. तेव्हाचे पोलिसही दिसतात. चौपाटीवर जाणाऱ्या लोकांच्या झडत्या घेणं हे ही तितकंच जुनं आहे हे ही दिसून येईल.. गंमत म्हणजे पोलिसाच्या वेशातलाही एक गणपती मिरवणूक दिसून येतोय. आजही आपण पारंपारिक गणपती अशा वेगवेगळ्या रूपांत असावा की नाही या चर्चा करत असताना तब्बल ७० वर्षांपूर्वीही ही परंपरा असावी याचं थोडं नवलच आहे, नाही का?

या व्हिडिओत नळभागाचा काही भाग दिसतो. इथलं गोल देऊळ तुम्हांला लगेच ओळखू येईल. आताचं मात्र या देवळाचं रूपडं थोडं बदललं आहे.. मात्र विसर्जनाचा उत्साह, लोकांची लगबग, पोलिसी बंदोबस्त मात्र आहे तसाच आहे.. चला तर मग, या निमित्तानं थोडा इतिहासात फेरफटका मारून येऊ..
