तुमच्याबाबतीत असं कधी झालंय का की तुम्हांला कडकडून भूक लागलीये. त्यात तुम्हाला स्वयंपाक करता येत नाही आणि नेमकी त्याच वेळी आईपण गावी गेलीय. मग तुम्ही काय करता?? त्यात दोन मिनिटांत मॅगी बनवून खायचे दिवस ही आता गेलेत म्हणा.. मग तुम्ही झोमॅटो, फूड पांडा नाहीतर स्विगीवरून सरळ जेवण ऑर्डर करता. कधी एकदा जेवण येतं आणि आपण त्याचा फडशा पाडतो असं होतं असतं. आजकाल हे बरं झालंय. घरी आई असेल-नसेल पण मोबाईलमध्ये झोमॅटो आणि स्वीगी, फूडपांडा ही ॲप्स आवर्जून हवी असतात.
दोन फ्राइड चिकनच्या ऑर्डरसाठी ४२ डिलिव्हरी बॉय कसे आले? फिलिपाईन्समध्ये काय घडलंय ?


पण ही ॲप्सही कधीकधी जाम गोत्यात आणतात बरं! त्याचं काय झालं माहितेय का?? फिलिपाईन्समध्ये एका सात वर्षांच्या मुलीने फूडपांडावरून दोन फ्राइड चिकन ऑर्डर केले होते. एक तिच्यासाठी आणि एक तिच्या आजीसाठी. तिचे आईवडील दोघेही नोकरीनिमित्त बाहेर गेले होते. मग अशा वेळी मोबाईल ॲपवरून जेवण कसे ऑर्डर करायचे हे तिच्या आई वडिलांनी तिला शिकवले होते. मग तिने ऑर्डर करायला सुरुवात केली. स्लो इंटरनेटमुळे म्हणा, किंवा ॲपमधल्या काही तक्रारींमुळे म्हणा, प्रत्येकवेळी काहीतरी error येत होता. असे करत करत बऱ्याच प्रयत्नांनंतर एकदाची तिची ऑर्डर confirm झाली. आता येईल, नंतर येईल म्हणून ती इवलीशी सात वर्षांची मुलगी वाट बघत बसली होती. पण जेव्हा ती ऑर्डर घ्यायला तिच्या घराबाहेर गेली, तेव्हा मात्र तिला रडू कोसळले. आता तुम्ही म्हणाल, ऑर्डर तर आली मग का रडायला आले?

तर त्याच झालं असं की, ऑर्डर देत असताना जितक्या वेळा तिला तिच्या मोबाईलमध्ये error आली, तितक्या ऑर्डर्स घेऊन एक-दोन नाही तर तब्बल ४२ डिलिव्हरी बॉय फ्राईड चिकनची ऑर्डर तिथे घेऊन आले होते. पटण्यासारखी नसली तरी ही गोष्ट खरी आहे. तिथे राहणाऱ्या Dann Kayne Saurez नावाच्या एका माणसाने ह्या घटनेचा लाइव्ह व्हिडीओ आपल्या फेसबुकवर शेअर केला होता.
तुम्ही कल्पना करू शकता, एका छोट्याश्या गल्लीमध्ये एकसारखे गुलाबी रंगाचे यूनिफॉर्म घातलेले फूडपांडाचे ते ४२ डिलिव्हरी बॉईज हजर झालेले आहेत. हे सगळे एखाद्या गेम मधून अचानक बाहेर आलेत की काय असंच वाटत होतं. ४२ ऑर्डर्स येऊनही ती सात वर्षांची मुलगी मात्र खूप रडत होती. कारण ४२ जणांना द्यायला तिच्याकडे पैसे न्हवते. तिच्या आईने तिला एकाच ऑर्डरचे पैसे दिले होते. तिची ती रडवेली अवस्था पाहून काही शेजाऱ्यांनी ते फ्राईड चिकन विकत घेतले. तर काही डिलिव्हरी बॉईज पैसे न घेताच निघून गेले. ही गोष्ट मात्र वाऱ्यासारखी आख्या फिलिपाईन्समध्ये पसरली आहे.
खरंतर रेस्टॉरंटनेही एकाच ठिकाणाहून सारखीच ऑर्डर ४२वेळा आल्यानंतर तिची खातरजमा करायला हवी होती. काही असो, सात वर्षांच्या पोरीकडे बघून या गोष्टीचं कौतुक होत आहे. तुम्ही मात्र इथून पुढे जेव्हा कधी खाणं ऑर्डर कराल तेव्हा ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ॲपमध्ये किंवा इंटरनेट स्पीडमुळे काही एरर आली तर शेवटी रेस्टॉरंटला फोन करून नक्की किती ऑर्डर गेलीय याची खातरजमा करा. बरोबर ना?
लेखिका: स्नेहल बंडगर