आपल्याकडे घरोघरच्या आज्यांनी विणलेल्या उबदार वस्त्रांची परंपरा फार मोठी आहे. बहुधा घरातल्या गोधडीचं क्रेडिट आजीचं असतं. त्या गोधडीची उब वेगळीच! ते केवळ थंडीपासून संरक्षण करणारं वस्त्र नसतं, तर तो एक समृद्ध वारसा असतो, मायेचं प्रतीक असतं. गोधडीच नाही तर स्वेटर, मोजे, शाल, मफलर, कानटोपी अशा अनेक वस्त्रांची हीच तर गंमत आहे. तसं तर आज सगळं काही रेडीमेड मिळतं, तेही हवं तेव्हा. पण या घरगुती, हॅण्डमेड गोष्टींचं महत्त्व खासच आहे. नेमका हाच मुद्दा घेऊन नेपाळमध्ये एक ब्रँड आकाराला आला आहे. त्याचं नाव आजी'ज! घरोघरच्या कुशल आज्यांनी आपल्या हातांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देणारा आणि त्यांचा आत्मविश्वास नव्याने जागवणारा हा ब्रॅण्ड.
नेपाळच्या तरुणी आजीचा ब्रँड जगभर पोचवत आहेत...काय आहे ही संकल्पना?


लॉरीना स्थापित नावाची नेपाळी तरुणी आजी'ज या ब्रॅण्डची संस्थापिका आहे. आपल्या आजीने विणलेल्या मोज्यांना आज तिने जागतिक स्तरावर नेलं आहे. ब्रँड जरी आताआता उभा राहिला असला तरी त्याबद्दलची तिची स्वप्नं पूर्वीपासूनची आहेत. दरवर्षी हिवाळा आला की लॉरीना आणि तिची चुलत भावंडं यांची पावलं वळायची त्यांच्या आजीने विणलेले लोकरी पायमोजे ठेवलेले असायचे त्या कपाटाकडे. पायाला व्यवस्थित उब देणारे हे मोजे त्यांच्यासाठी खासच होते. आपल्या कपाटातल्या पायमोज्यांच्या रंगीबेरंगी जोड्या पाहून लॉरीनाला नेहमी वाटायचं, हे इतरांनी पण पाहावं. सगळ्या जगाला आपल्या आजीने विणलेल्या सुंदर पायमोज्यांबद्दल कळावं. तेव्हाच तिने ठरवलं, संधी मिळेल तेव्हा आपल्या आजीचं हे 'क्रिएशन' जगापुढे आणायचं. आजी'ज या ब्रँडची स्थापना या तळमळीतूनच झाली. अर्थात केवळ या मोज्यांना बाजारपेठ मिळवून देणं इतकाच यामागचा हेतू नाही, तर लॉरीनाच्या मते, या प्रत्येक कलाकृतीमागे एक कहाणी होती. तिच्या आजीच्या पिढीतल्या लोकांनी जपलेला तो समृद्ध वारसा पुढील पिढयांपर्यंत पोहोचायलाच हवा होता.

लॉरीनाचं बालपण रेडीमेडच्या जमान्यापासून काहीसं लांब होतं. रोज लागणाऱ्या बहुतेक वस्तू घरीच बनवलेल्या असत. त्या वस्तूंचं त्यामुळे एक वेगळं महत्त्व होतं. ती वस्तू केवळ एक वस्तू न राहता त्या काळातल्या लोकांच्या अंगी असलेल्या कलाकौशल्य आणि स्वावलंबन या गोष्टींचं प्रतीक होती. अनुभवी हातांनी घडवलेल्या या वस्तू त्या काळात समाजजीवन कसं होतं याची झलक दाखवत.

लॉरीना स्थापितने आपली बहीण आयरिना आणि नवरा पुरसार्थ तुलाधर यांच्या साहाय्याने आजी'ज या ब्रॅण्डची मुहूर्तमेढ २०१८ मध्ये रोवली. आज या ब्रॅण्डच्या माध्यमातून लोकरीचे कपडे, ब्लॅन्केट्स आणि ज्युएलरी विकले जातात. याच्याच जोडीला पॉडकास्ट आणि ब्लॉग्ज यांचा वापर करून लॉरीना आणि तिची भावंडं या वयोवृद्ध कलाकारांच्या आयुष्याचा प्रवास कथन करतात, अनेक रसिक तो अनुभवतात, त्याला दादही देतात. यातल्या अनेक गोष्टी त्या नेपाळी श्रोत्यांना कल्चरल शॉक वाटतील अशा आहेत. विशेषतः लॉरिनाच्या आजीचा आजवरचा प्रवास. वयाच्या आठव्या वर्षी लग्न, शिक्षणाचा हक्क नाकारला जाणं, त्यासाठीचा संघर्ष, पुरुषप्रधान संस्कृतीत राहून पाचपाच मुलांना एकल माता बनून वाढवणं, आणि आज सत्तरीच्या उंबरठ्यावर तिला एक नवी हवीहवीशी संधी मिळणं हे सगळंच अद्भुत. नेपाळच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासावर प्रकाश टाकणाऱ्या या कथा आवडीने ऐकणारे अनेकजण आहेत.

अशाच विलक्षण आजीच्या घरात काठमांडू इथे जन्मलेल्या लॉरीनाला कथ्थक नृत्याचं खूप आकर्षण. ती ते शिकली आणि १८ व्या वर्षापासून कार्यक्रमही करायला लागली. पुढे तिने नेपाळच्या पद्मकन्या मल्टिपल कॅम्पस नावाच्या महिला महाविद्यालयात महिला सक्षमीकरण हा विषयपण शिकवला. मग सुमारे दहा वर्षं तिने ऑक्सफॅम आणि युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल फंड फॉर ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट यांच्यासाठी काम केलं, युगांडा ते उझबेकिस्तान असा प्रवास केला. पण आतून मायभूमीची ओढ कायम होती. जोडीला उराशी जपलेलं स्वप्न होतंच. अखेर तिने आपला जॉब सोडला आणि मग सुरू झाला आजी'ज चा प्रवास.

तिची काहीशी हटके संकल्पना आणि पडद्याआड राहिलेल्या कारागिरांना ओळख देण्याची तळमळ यातून तिला पहिले काही ग्राहक मिळाले. त्यांना हे प्रॉडक्ट आवडलं. हळूहळू त्यांनी माऊथ पब्लिसिटीद्वारे तिला अजून ग्राहक मिळवून दिले आणि त्यातून हळूहळू व्यवसाय विस्तारत गेला. आता तिचा ब्रँड इंटरनॅशनल बनला आहे. आज आजी'ज मध्ये ३० वयोवृद्ध कारागीर काम करतात. यात महिला आणि पुरुष दोघंही आहेत! त्यांची खासियत वापरून ते नेपाळी पारंपरिक तंत्रं आणि मटेरियल यांच्या साहाय्याने सुंदर कलाकृती साकारतात. या वस्तू काठमांडूमधील दोन मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवल्या जातात, शिवाय इटसी या ऑनलाईन शॉपिंग साईटवरही त्या उपलब्ध आहेत.

आज यातून या कारागिरांना केवळ रोजगार मिळालेला नाही, तर त्यांचा आत्मसन्मान वाढला आहे. एरवी ज्या वयात माणसं निवृत्त होऊन नंतर वेळ कसा घालवावा याची चिंता करत बसतात, तिथे हे नौजवान कारागीर सेकंड इनिंग मोठ्या उत्साहाने खेळत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास, बोलण्यात आलेला धीटपणा खूप काही सांगून जातो. अगदी लॉरीनाची स्वतःची ७७ वर्षांची आजी विणकाम करताना आपली सांधेदुखी विसरते. आपण विणलेले मोजे आज जगात प्रसिद्ध झालेत हे ऐकून तिच्या वृद्ध डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. तिला मिळालेलं समाधान इतकं मोठं आहे, की ती आपल्यासारख्या इतर चार वृद्धांना काम करायचा आणि पैसे मिळवायचा सल्ला देते. मनासाठी याहून उत्तम टॉनिक ते कोणतं?

दिल हेरा तुलाधर ही अजून एक कारागीर आजी. तिच्या कुशल बोटांनी वर्षानुवर्षे पारंपरिक चादरी आणि शाली विणल्या आहेत. पण आता तिची हीच कला तिला पैसे मिळवून देतेय. आजपर्यंत स्वतः पैसा कमावण्याचा कधीच अनुभव नसलेल्या या ८० वर्षाच्या आजीबाई पैसे मिळवण्याच्या जाणिवेनेच खूश आहेत.
लॉरीनासाठी तिच्या ब्रँडने अपेक्षेपेक्षा बरीच पुढची मजल मारली आहे. ती आणि तिच्या भावंडांमुळे नेपाळचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या या वयोवृद्ध कारागिरांना नवी ओळख मिळाली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान तिला अजून पुढे जायला प्रोत्साहन देत आहे.
लेखिका: स्मिता जोगळेकर