पाण्याचे महत्व माणसाच्या आयुष्यात किती आहे हे पावसाने ओढ दिल्यावर कळते. जरा पावसाला उशिर झाला किंवा पाऊस कमी प्रमाणात झाला की सगळेच चिंतेत पडतात. शहरात तर टँकरची रांग लागते. पण भारताच्या ग्रामीण भागात परिस्थिती खूप भीषण आहे. अनेक गावांत वर्षानुवर्षे कमी पाऊस पडतो. दुष्काळामुळे जिथे प्यायला पाणी मिळत नाही तिथे शेतीला पाणी कसे मिळणार? पण आजच्या लेखात अशी ६ गावं पाहुयात जिथे स्थानिक लोकांनी चिकाटी व मेहनतीने इथल्या दुष्काळाची परिस्थिती अनुकूल बनविली. यापैकी बर्याच ठिकाणी वर्षाकाठी २५० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडतो. परंतु त्यांनी गावात काही बदल घडवून आणले ज्यामुळे आता समृद्धी आली आहे. आताची परिस्थिती इतकी सुधारली आहे की उन्हाळ्यातही या भागात पाण्याची कमतरता भासत नाही. हा बदल नक्की कसा झाला ते पाहूयात.
जागतिक जलदिन : पाण्याचं योग्य व्यवस्थापन केल्याने या ६ गावांनी दुष्काळावर कशी मात केली?


१. राळेगणसिद्धी , महाराष्ट्र
इथे २५०-३०० मिमी सरासरी वार्षिक पाऊस पडतो.
१९८० पर्यंतची परिस्थिती
या गावात १७०० एकर जागेपैकी केवळ ८० एकरांवर सिंचन शक्य होते. दुष्काळामुळे तिथले पुरुष शेती सोडून वीटभट्ट्यांमध्ये काम करायला गेले. काहीजण गावातच अवैध दारू बनवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. डोक्यावर घेतलेल्या कर्जाचा भार दिवसेंदिवस वाढत होता. उपासमारीने बालमृत्यूचे प्रमाण जास्त होते.
सध्याची बदललेली परिस्थिती
गावाची बिकट परिस्थिती बघून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी १८ वर्षांपूर्वी गावात पावसाच्या पाण्याची साठवण सुरू केली. तिथल्या स्थानिक लोकांच्या मदतीने तिथे तलाव, धरण व विहिरी बांधण्यात आल्या. आज १२०० एकर शेती जमीन सिंचनाखाली आली आहे. शेतकरी वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची तीन पिके घेत आहेत. भाजीपाला, रेशन आणि दूधही विकले जाते. गावात दारू बंदी करण्यात आली. सगळे अवैध धंदे बंद झाले. जिथे इतका कमी पाऊस होता तिथल्या गावात आज मुले पोहण्याचा सराव करून स्पर्धा जिंकत आहेत.
२. अलवर, राजस्थान
इथे ३५०-४५० मिमी सरासरी वार्षिक पाऊस पडतो.
१९८५ पर्यंतची परिस्थिती
राजस्थान हा कोरडा भाग म्हणून प्रसिद्ध आहे. १९८५ पर्यंत अलवरमध्ये भूजल पातळी दोनशे फूट खाली होती. महिला दूरवर जाऊन दुर्गम भागातून पाणी आणत असत. पिण्याचे पाणी आणणे हे रोजचे काम होते. गावात पाणी नसल्याने स्थलांतर वाढले होते.
सध्याची बदललेली परिस्थिती
जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी तेथे पावसाचे पाणी साचण्यासाठी मोहीम राबविली. १,०५८ खेड्यांमध्ये आठ हजाराहून अधिक जहार (कुंड) बांधले. जमिनीचे सिंचन सुधारण्यास अनेक रोपे लावली. १९९५ पर्यंत पावसाळ्यानंतरच अरवरी नदीचे पात्र कोरडे व्हायचे. तिथल्या गावातल्या लोकांनी मिळून ती नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले. ७० गावातल्या १५० जणांनी नदीच्या स्वच्छतेसाठी एक संस्था स्थापन केली. पावसाळ्यात पाणी साठू लागले. आता वर्षात तीन पिके घेतली जातात. रोजगार वाढला आणि ८५ टक्के स्थलांतर थांबले.

३. राज समाधी, राजकोट गुजरात
इथे ३०० मिमी पेक्षा कमी वार्षिक सरासरी पाऊस पडतो.
१९८५ पर्यंतची परिस्थिती
भूजल पातळी २५० मीटरपर्यंत खाली आली होती. सरासरी प्रति हेक्टर उत्पन्न फक्त ४६०० होते.
बदललेली परिस्थिती
जिल्हा ग्रामीण विकास प्राधिकरण कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून ग्रामस्थांनी सुमारे दोन हजार हेक्टर जागेवर ४५ रोधी बांध (Check dam) बांधले आणि ३५ हजार रोपे लावली. २००३ मध्ये पाऊस एक थेंबही पडलेला नव्हता, तरीही भूजल पातळी १५ मीटर पर्यंत वाढली होती. १९८५ मध्ये दोन गोड्या पाण्याचे बारमाही विहिरी होत्या. तिथल्या गावकऱ्यांच्या प्रयत्नांमुळे २००२ मध्ये विहिरींची संख्या १४ झाली. २००१ मध्ये गावाचे उत्पन्न वाढून साडेचार कोटी झाले. एकाच हंगामात तीन पिके वाढू लागली. यामुळे लोकांचे उत्पन्न वेगाने वाढले.

४. माहुडी, दाहोद गुजरात
इथे ८३० मिमी पेक्षा कमी वार्षिक सरासरी पाऊस पडतो. १९९९ मध्ये केवळ ३५० मिमी पाऊस होता.
१९९९ पर्यंत परिस्थिती
पाण्याची अतिशय वाईट परिस्थिती होती. घरापर्यंत पाणी पोहोचले नव्हते. दूरवरून पाणी आणावे लागायचे.
सध्याची बदललेली परिस्थिती
स्थानिक ग्रामस्थांनी मचान नदीच्या तोंडाभोवती मोठ्या प्रमाणात धरणे बांधली. योग्य पद्धतीने सिंचनाची व्यवस्था केली. शेकडो झाडे लावली. वार्षिक कृषी उत्पादन हेक्टरी ९०० क्विंटलवरून ४००० क्विंटल प्रति हेक्टरपर्यंत वाढले. एका वर्षात तीन पिके मिळू लागली. शुद्ध पिण्याचे पाणी मिळाले. १९९९ मध्ये वार्षिक सरासरी उत्पन्न ३५००० च्या वर पोहोचले. नळाद्वारे घरोघरी पाण्याची व्यवस्था केली गेली. बायकांची पाण्यासाठी वणवण थांबली. चाऱ्याचे उत्पादन वाढल्याने दुधाचेही उत्पादन चांगले वाढले.

५. डेरवाडी गाव, अहमदनगर, महाराष्ट्र
इथे ३०० मिमी इतका सरासरी वार्षिक पाऊस पडतो.
१९९६ पर्यंत परिस्थिती
दुष्काळग्रस्त गाव असल्याने पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी कमी होते. चांगला पाऊस असूनही कृषी उत्पादन खूप कमी होते.
बदललेली परिस्थिती
प्रतिबंधित वनक्षेत्रात शेती करण्यास ग्रामस्थांनी वनविभागाची परवानगी घेतली. त्यांनी रिज टू व्हॅली या संकल्पनेवर काम केले. ज्यामुळे शेतकर्यांना पाणी मिळू लागले. त्यांनी वेगवेगळी पिके घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे वार्षिक उत्पादन वाढले. गावात रोजगार वाढला, दुग्धशाळा, रोपवाटिका, पोल्ट्री क्षेत्रात विकास झाला.

६. गांधीग्राम, कच्छ गुजरात
इथे ३४० मिमी सरासरी वार्षिक पाऊस पडतो.
२००० पूर्वीची परिस्थिती
पाणी संकटामुळे शेतीची परिस्थिती खूप बिकट होती. धरण नसल्याने पाण्याचा साठा होत नव्हता. वर्षभर पाण्याचा प्रश्न भेडसावत होता.
सध्याची बदललेली परिस्थिती
पाण्याची परिस्थिती पाहून गावकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढून धरणं बांधली. ग्रामस्थांनी पाच मोठे धरण बांधले. तसेच ७२ छोटी धरणं व ७२ लहान-मोठे नाले बांधले. २००१ मध्ये सगळ्यात कमी पाऊस म्हणजे केवळ १६५ मिमी पाऊस पडला. तरीही तेव्हा तलावामध्ये आणि गावातील अन्य जलस्रोतांमध्ये वाजवी प्रमाणात पाणी होते. गावकऱ्यांना नळातून विहिरींचे पाणी मिळू लागले. शेतकऱ्यांनी गहू, कांदा, जिरे अशी नवीन पिके घेण्यास सुरुवात केली. रोजगार वाढला.
दुष्काळी भागात लोकांनी एकत्र आल्यास पाण्याची परिस्थिती सहज बदलू शकते. पाण्याची योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास नक्कीच वर्षभर त्याचा फायदा मिळू शकतो हेच या उदाहरणांवरून सिद्ध होते.
लेखिका: शीतल दरंदळे