‘२० मार्च’ ही तारीख एखाद्या उत्पादनाचं नाव होऊ शकते का? ही कल्पना अर्थातच विचित्र वाटते, पण हे खरोखर घडलं आहे. महाराष्ट्रातील एका बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडला २० मार्च नाव देण्यात आलं आहे. तुम्हाला वाटेल की कंपनीच्या मालकाचा किंवा त्याच्या मुला/मुलीचा वाढदिवस या दिवशी असल्याने त्याने २० मार्च नाव दिलं असावं. खरं तर या नावामागे एक वेगळंच कारण आहे.
२० मार्च ही तारीख ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. याच दिवशी १९२७ साली बाबासाहेब आंबेडकरांनी महाड सत्याग्रह किंवा ज्याला आपण चवदार तळ्याचं आंदोलन म्हणतो त्याची सुरुवात केली होती. हे आंदोलन यशस्वी झाल्याने एका नवीन युगाचीच सुरुवात झाल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
या महत्त्वाच्या दिवसाचं नाव आपल्या उत्पादनाला देण्याची कल्पना अविचल धीवर यांची होती. आजच्या जल दिवसाच्या निमित्ताने ‘२० मार्च’ पाण्याची ही कथा बोभाटाच्या वाचकांसाठी.







