लग्न लावून द्या नाहीतर जीव देतो...या आजोबांचं आंदोलन पाहिलं का?

लिस्टिकल
लग्न लावून द्या नाहीतर जीव देतो...या आजोबांचं आंदोलन पाहिलं का?

शोले सिनेमात बसंतीला लग्नासाठी तयार करण्यासाठी विरु पाण्याच्या टाकीवर चढला, पण पूर्ण देशाला एक ब्लॅकमेलिंगची आयडिया देऊन गेला. गेल्या ५० वर्षांत टाकीवर चढून ब्लॅकमेलिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत.

पण आज आम्ही जी घटना सांगणार आहोत, ती एकाचवेळी हास्यास्पद आणि तितकीच सहानुभूती वाटणारी आहे. राजस्थान येथील ढोलपूर जिल्ह्यातील सोबरन सिंग या ६० वर्षीय गृहस्थाची बायको चार वर्षांपूर्वी निधन पावली. तेव्हापासून त्यांना एकटे वाटत होते. सोबरन सिंग यांना ५ मुले आणि काही नातवंडे आहेत. पण तरी एकटं वाटून त्यांच्या मनात या वयात लग्न करायचा विचार आला.

आपल्याला खूप एकटे वाटते म्हणून त्यांनी दुसरे लग्न करण्याचा प्रस्ताव घरात ठेवला. पण घरात काय कोण ऐकून घ्यायला तयार नव्हते. आता नातवंडे खेळवण्याचे सोडून कुठे लग्न करता असे त्यांचे म्हणणे, पण सोबरन सिंग यांना काय चैन पडेना त्यांनी मग अजब आयडिया लढवली.

सिंग थेट इलेक्ट्रिक पोलवर चढले. लग्न करून द्या नाहीतर आताच आत्महत्या करतो अशी धमकी त्यांनी दिली. खाली उभ्या असलेल्या लोकांनी त्यांना खाली उतरण्याची विनंती केली, पण सिंग हे थेट हाय वोल्ट वायर जवळ जाऊन बसले.

पण काही लोकांनी सावधगिरी बाळगून लगेचच इलेक्ट्रिशियनला बोलवून घेतले आणि त्या पोलची वीज बंद केली. म्हाताऱ्या आजोबांना एका तरुणाने पोलवर चढून समजवून सांगितले तेव्हा कुठे बाबा खाली उतरले. पण या घटनेने मात्र लोकांना चर्चेसाठी अजून एक मुद्दा मिळाला. या आजोबांचे आता लग्न लावून दिले जाते की त्यांना समजावून शांत केले जाते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.