भारतातले अनेक परिसर आजही मागास आहेत. कदाचित हेच कारण असेल ज्यामुळे तिथे शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रोजगार अशा सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आजच्या काळात या सर्व सुविधा व्यवस्थित आयुष्य जगण्यासाठी गरजेच्या आहेत. अशा परिसरात एखादा अवलिया असतो जो स्वतःचे जिवन या लोकांचे सुधारण्यासाठी वेचत असतो.
पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील धालाबाडी गावाचा परिसर देखील असाच मागास आहे. तिथे एखाद्याला दवाखान्यात घेऊन जायचे असेल तर कसे घेऊन जायचे हाच मोठा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत करीमुल हक नावाच्या एका व्यक्तीने आपल्या मोटरसायकलला रुग्णवाहिकेत रुपांतरीत केले. गेली कित्येक वर्ष ते आपल्या मोटारसायकलवर रुग्णांना घेऊन दवाखान्यात जात आहेत. त्यांच्या या निस्वार्थ समाजसेवेचा गौरव म्हणून त्यांना भारत सरकारने पद्मश्री देऊन सन्मान केला आहे.



