काही लोक प्रचंड उत्साही आणि ऊर्जावान असतात. या लोकांसाठी वय म्हणजे फक्त नंबर असतो. यांनी आयुष्यात जे मिळवायचे ते सगळे केलेले असते. पण काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा ध्यास यांना काही स्वस्थ बसू देत नाही. आज आपण वाचणार आहोत डॉ. किरण सेठ यांच्याबद्दल! त्यांचं वय आहे ७३ वर्षे!! आयआयटीमधून प्राध्यापक म्हणून निवृत्त झालेला माणूस!! देशासाठी दिलेल्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित असे व्यक्तिमत्त्व.
त्यांनी एक संकल्प केला तब्बल २५०० किलोमीटरचा प्रवास करायचा, तोही सायकलने. इतका मोठा प्रवास सायकलने करणे म्हणजे सोपे काम नाही. पण डॉ. सेठ कामाला लागले. ११ मार्चला दिल्ली येथील महात्मा गांधींची समाधी राजघाट येथून त्यांनी हा प्रवास सुरू केला. नुकताच ५ तारखेला त्यांचा हा प्रवास पूर्ण झाला.


