मराठी पाऊल पडते पुढे आणि मुलींची उंच भरारी हे एकाचवेळी म्हणता येणे हा योगायोग भन्नाट असतो. ही संधी महाराष्ट्राला पुन्हा एकदा मिळाली आहे. यंदाच्या खेलो इंडिया स्पर्धेत सांगलीच्या अवघ्या १६ वर्षे वयाच्या काजल सरगरने सुवर्णपदक जिंकत इतिहास घडवला आहे.
काजलने केलेला हा पराक्रम महत्वाचा आहे. भारताला पुढच्या ऑलिम्पिकमध्ये अजून एका पदकाची अपेक्षा धरायला काहीही हरकत नाही. तसेच एका मराठी कुटुंबातील एका मुलीने घेतलेली ही झेप निश्चितच अभिमानास्पद म्हणावी अशी आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खेलो इंडिया स्पर्धा भरविण्यात आली होती. यंदा स्पर्धचे यजमान होते हरियाणा राज्य!! पंचकुला येथे या स्पर्धा पार पडल्या. पूर्ण स्पर्धेत पदकपालिकेत महाराष्ट्राने दबदबा राखत पहिला क्रमांक मिळवला आहे. काजलने वेटलिफ्टिंग या खेळात सहभाग घेतला होता. महिलांच्या ४० किलो वजनी गटात खेळणाऱ्या १६ वर्षांच्या काजलने तब्बल ११३ किलो वजन उचलत भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावली.


