जुन्या पुरातन स्थळांना भेट दिल्यानंतर आपल्याला वाटतही नाही की कधी काळी इथे मानवी वस्ती होती. आपल्या गड किल्ल्यांचंच उदाहरण घ्या ना. आज हे गड किल्ले पाहताना आपण कल्पनाही करू शकत नाही की आपले पूर्वज अशा ठिकाणी राहत होते. त्यांचे संपूर्ण जीवन त्यांनी या गड किल्ल्यावरच घालवले. कधीकाळी माणसांनी गजबजलेली ही ठिकाणे आज एकदम ओस पडली आहेत. काही ठिकाणे तर अगदी भकास झाली आहेत. पण, हे झालं फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. आजच्या काळातही जगाच्या पाठीवर अशी काही ठिकाणे आहेत. जी अगदी काल परवा पर्यंत म्हणजेच अगदी काही वर्षापूर्वी पर्यंत अशीच माणसांनी गजबजलेली होती, पण आज अगदी ओस पडली आहेत. अशाच काही ओस पडलेल्या पण कधी काळी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांची ही यादी.
एकेकाळी गजबजलेली पण आज सर्वात दुर्लक्षित अशी जगातली ८ ठिकाणे !!


१. इस्टटाऊन थिएटर, मिशिगन –
१९३० मध्ये बांधण्यात आलेले हे थिएटर चित्रपटगृह म्हणून प्रसिद्ध होते. याठिकाणी कितीतरी मोठमोठे चित्रपट प्रदर्शित झाले. शिवाय अनेक लोकप्रिय कलाकारांचे कार्यक्रमही याठिकाणी आयोजित केले जात असत. पिंक फ्लॉइड, अॅलिस कूपर, जेफर्सन एअरप्लेन आणि द डूअर्स सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचे आयोजन याच थिएटर मध्ये केले जात असे. परंतु प्रेक्षकांच्या सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने हे थिएटर धोक्याचे असल्याचे कारण देत नंतर नंतर इथे असे मोठमोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे बंद करण्यात आले. मधल्या काळात इथे जॅज कॉन्सर्ट, अॅडल्ट फिल्म आणि चर्चचे कार्यक्रम होऊ लागले. आज मात्र हे थिएटर पूर्णतः बंद आहे. त्याची पडझड झाल्या कारणाने एकेकाळच्या या झगमगाटी इमारतीकडे आज कुणी फिरकतही नाही. त्याच्या पडक्या अवस्थेमुळेच लोकांना या थिएटर मध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

२) सेन्ट्रालिया, पेनिसिल्वानिया –
१९६२ साली या गावात आग लागली होती. या आगीची तीव्रता इतकी होती की त्याकाळी हे गाव संपूर्ण जगभर चर्चेचा विषय बनले होते. पन्नास वर्षानंतर आजही या आगीच्या ज्वाळांनी भस्मसात केलेल्या खुणा या गावात पाहायला मिळतात. बरेच प्रयत्न करूनही ही आग आटोक्यात आली नाही तेंव्हा या गावातील लोकांना हे गाव सोडून दुसरीकडे जाण्यास सांगितले आणि त्यांना नवे गाव वसवण्यासाठी ४.२ कोटी डॉलर इतका निधी देण्यात आला. या गावातील सफाई कर्मचाऱ्यांनी कचऱ्याचा एक छोटा ढीग जाळण्यासाठी आग लावली होती, पण या कचऱ्याच्या छोट्या ढिगाने संपूर्ण गावच भस्मसात करून टाकले. मुळचे १० लोक सोडल्यास आजही या गावात कुणीही राहायला जात नाही.

३) युक्रेन मधील प्रीपॅट
युक्रेन मध्ये जगातील मोठा अणुस्फोट घडून आला होता. चेर्नोबिल पॉवर प्लांट मध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी हे शहर वसवण्यात आले होते. परंतु १९८६ साली इथे अणुस्फोट झाला, ज्याला चेर्नोबिल डिझास्टर म्हंटले जाते. अलीकडच्या काही वर्षात इथल्या किरणोत्सर्गाची तीव्रता कमी झाली आहे. आज शहरातील अनेक इमारती, दुकाने, शाळा, रेस्टॉरंट आणि मोठमोठाले बगीचे ओस पडले आहेत.

४) हाशिम बेट, जपान
या बेटावर अनेक खाणी होत्या. त्यामुळे इथे खाण कामगारांचीच वस्ती जास्त होती. जगप्रसिद्ध मित्सुबिशी कंपनीने या खाणी विकत घेतल्याहोत्या. १८७७ ते १९७४ पर्यंत या खाणी सुरु होत्या. परंतु, जपानने इंधन म्हणून कोळश्या ऐवजी पेट्रोलियमचा वापर सुरु केल्यावर या खाणी बंद करण्यात आल्या. आज मात्र निव्वळ पर्यटन क्षेत्र म्हणूनच हे बेट खुले करण्यात आले आहे. युनेस्कोने या बेटाला जागतिक वारसास्थळाचा दर्जा द्यावा यासाठीही अर्ज करण्यात आला आहे.

५) सांझी युएफओ, तैवान
तैवान मध्ये अनेक विचित्र इमारती पाहायला मिळतात. पण, सांझी मधील ही इमारत फारच विचित्र आहे. १९७८ साली अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांसाठी परग्रहावरून येणाऱ्या उडत्या तबकडीच्या आकाराची ही इमारत बांधण्यात आली होती. ही इमारत पूर्ण करण्यासाठी भरपूर पैसा खर्च झाला. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही याचे परिणाम दिसून आले. त्यामुळे हे बांधकाम थांबवण्यात आले. तरीही या प्रकल्पाअंतर्गत बांधलेली काही घरे कित्येक वर्षे तशीच होती. या घरात भूतांचा वास असल्याच्या अफवाही पसरल्या. याठिकाणी विचित्र प्रकारे अपघात होण्याच्याही अनेक घटना घडल्या. ही घरे नंतर पाडण्यात आली. इथे बांधकाम करणाऱ्या मजुरांना याठिकाणी २०,००० लोकांची हाडे आढळून आल्याचे म्हंटले जाते. २०१० साली ही सगळी घरे जमीनदोस्त करण्यात आली. आज याठिकाणी एक नवीन वाटर पार्क आणि रिसॉर्ट उभारण्यात आले आहे.

६) हॅलुडूव्हो पॅलेस हॉटेल, क्रोएशिया
क्रोएशिया हा युगोस्लाव मधील एक जुना रिपब्लिक देश. याठिकाणी एक रिसॉर्ट, हॉटेल आणि कॅसिनो आहे जिथे जायला बंदी घालण्यात आली आहे. कधीकाळी अलिशान वाटणारी ही इमारत आज पडकी झाली आहे. इमारतीच्या आतही झाडेझुडपे उगवली आहेत. काळाच्या ओघात या इमारतीचे सगळे सौंदर्य काळवंडून गेले आहे. याठिकाणी कधी काळी मोठमोठे देशातील बड्या वर्तुळात वावरणारे लोक येऊन पाहुणचार घेत असत. पेंटहाऊस मॅग्झीनचे संस्थापक बॉब ग्युसिनो यांनी ४५ दशलक्ष डॉलर इतका पैसा खर्च करून ही इमारत बांधली होती. परंतु दिवाळखोरीमुळे गेले दोन दशके हे रिसॉर्ट बंद असल्याने आज याची पूर्ण रयाच गेली आहे.

७) पिचर, ओक्लाहोमा
ओक्लाहोमा येथील पिचर हे अमेरिकेतील एक अत्यंत विषारी शहर म्हणून ओळखले जाते. याठिकाणी लीड म्हणजे शिसे आणि झिंकच्या मोठमोठ्या खाणी सापडल्या होत्या. १९०० साली इथे राहणाऱ्या ६३% मुलांवर शिस्याच्या विषाचा परिणाम दिसून आला होता. २००५ पासून सरकारने आणि पोलिसांनी इथल्या रहिवाश्यांना जबरदस्तीने हे शहर सोडण्यास सांगितले. आज हे शहर ओसाड पडले आहे.

८) सिक्स फ्लॅग्ज न्यू ऑर्लिन्स
कॅटरीना वादळानंतर या ठिकाणी बरेच बदल झाले. काही झाले तरी माणूस निसर्गापुढे किती क्षुल्लक प्राणी आहे याची जाणीव करून देणाऱ्या अनेक खुणा इथे सापडतील. कॅटरीना वादळामुळे झालेला विध्वंस आणि त्याच्या खुणा आजही सिक्स फ्लॅग्ज न्यू ऑर्लिन्स इथे पाहायला मिळतात. या परिसरात खूप मोठा पूर आला होता. इथले हे पार्क पूर्णतः महापुराच्या पाण्यात वाहून गेले होते. या पार्कच्या मालकाने पुन्हा एकदा पार्क उभे करण्यासाठी परवानगी मागितली होती, पण ती नाकारण्यात आली.
हजारो वर्षापूर्वीच्या भग्न अवशेषांच्या खुणा पाहण्यात भलेही आनंद मिळत असेल, पण या आधुनिक काळातील असे भग्न अवशेष पाहिल्यावर उदास आणि स्तिमित व्हायला होते.
लेखिका: मेघश्री श्रेष्ठी