कोण आहे हा 'ट्रिवागो'वाला मनुष्य प्राणी ??

कोण आहे हा 'ट्रिवागो'वाला मनुष्य प्राणी ??

टिव्ही, युट्युबवर, इंटरनेटवर आणि जिथे जिथे दाखवू शकतो तिथे सध्या एक जाहिरात सारखीसारखी येऊन डोकं खात असते. त्यात कधी एक बाई येते आणि इंग्लिशमध्ये विचारते ‘तुम्ही कधी ऑनलाईन हॉटेल सर्च केलंय का ?’ आणि काही वेळा एक बाप्या येतो अन विचारतो, ‘क्या आपने कभी ऑनलाइन हॉटेल सर्च किया हैं?'. आता ती बया तोंडावरून एक वेळ मॉडेल वाटतेही.. पण हा भाऊ कोण आहे? आणि तब्बल १ मिनिट म्हणजे ६० सेकंद घेतो हा सगळं सांगायला.

आम्ही शोध घेतल्यावर समजलं की हा तर ट्रिवागो कंपनीचा बॉस आहे राव!! मला वाटलंच होतं असं तुमच्या मनात आलं असेल. याचं नाव आहे ‘अभिनव कुमार’. हे गृहस्थ ‘ट्रिवागो कंट्री डेव्हलपमेंट’ या ऑनलाईन हॉटेल सर्च इंजिनचे भारतातले डेव्हलपमेंट हेड आहेत. जाहिरातीसाठी योग्य मॉडेल मिळाली नसल्याने खुद्द त्यांनाच ही जाहिरात करावी लागली. एव्हाना कंपनीने असं ठरवूनच टाकलंय की जाहिरातीत कोणताही ओळखीचा चेहरा ब्रँड अँबॅसीडर म्हणून घ्यायचा नाही.

गेल्या काही महिन्यांपासून या जाहिराती सगळीकडे फिरत असताना सर्वांनाच प्रश्न पडला होता की हा माणूस आहे तरी कोण?  कुमार यांनी सांगितल्या प्रमाणे लोक त्यांना ट्रीवागो मॅन म्हणून ओळखतात.

मंडळी ही कंपनी बर्लिनमधली आहे आणि यांच्या जाहिरातीत स्पॅनिश, इंग्लिश, हिंदी अश्या भाषांमध्ये तयार झाल्या आहेत. यात साम्य काय आहे तर जाहिरातीची पद्धत आणि तोच तो ‘पकाऊपणा’. या जाहिरातींना अनेकांनीं ट्रोल केलेय राव. या अभिनव कुमारवर तर मेमेसुद्धा आलेत.

राव किती पण लोक बोलू द्या पण चर्चा होत आहे ना? कदाचित हेच या कंपनीला हवं असेल !!