जगातले देश आणि त्यांचे ध्वज हा वेगळाच विषय आहे. देशाची संस्कृती, मानचिह्ने, राजकीय सत्ता आणि भूमिका यांबद्दलचं ध्वज हा एक विधान असतो. त्यामुळे बरेचदा देशांचे ध्वज बदलतातही. ध्वजांच्या इतिहासात सर्वात जास्त वेळा अफगाणिस्तानचा ध्वज बदलण्यात आलाय आणि शेवटचा बदल आत्ता, यावर्षीच घडलाय. ३०व्यांदा हा ध्वज बदलण्यात आलाय.
गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात जे चालू होते त्यावर पूर्ण जगाचे लक्ष होते. तालिबान्यांनी हल्ला करून अफगाणिस्तानचा ताबा घेतला. अफगाणिस्तानचा स्वातंत्र्यदिन १९ ऑगस्ट रोजी असतो. तालिबानने राजधानी काबूलवर ताबा मिळवल्यानंतर काही दिवसांतच त्यांचा स्वातंत्र्यदिन आला. मात्र यावेळी काळा-लाल-हिरव्या ध्वजाऐवजी अरेबिक संदेश लिहिलेला पूर्ण पांढरा ध्वज त्यादिवशी फडकवण्यात आला. आज पाहूयात या ध्वज बदलांची संपूर्ण कहाणी..
अफगाणिस्तानला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळून १०० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊनही तालिबानमुळे अफगाणिस्तानला पुन्हा एकदा गुलामगिरीत अडकल्याचे जाणवत आहे. त्यांच्या विरोधात आता अफगाणिस्तानच्या लोकांनी स्वातंत्र्यलढा पुकारला आहे. आणि हा लढा लोकशाहीचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजासाठीही आहे. तालिबानला राष्ट्रध्वजाच्या जागी त्यांचा स्वतःचा ध्वज लावायचा आहे.






