मधासारखे गोड ही उक्ती आपण किती सहज वापरतो ना? म्हणजे साखर-गूळ यांना पर्याय मध म्हणून वापरले जाते. कारण तो गोड तर असतोच, पण आरोग्यदायीसुद्धा असतो. पण इटलीमध्ये चक्क कडू मध मिळतो!! हा मध मिळतो इटलीतील सार्डिनिया बेटावर, आणि तो ही मोठ्या प्रमाणात!! तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या मधाला २००० वर्षांची परंपरा आहे आणि आजही तो मिळतो. आज या मधाविषयीची माहिती घेऊयात.
इटलीतल्या या प्रसिद्ध मशाला सार्डिनियन मध असे म्हणतात. याला तसे कॉर्बेजेलो हनी म्हणूनही ओळखले जाते. या मधाची सर्वात खास गोष्ट म्हणजे हा नेहमीच्या मधासारखा गोड नसून कडू आहे. हा मध कॉर्बेजेलो वनस्पतींच्या फुलांपासून मिळतो. म्हणून त्याचे नाव कॉर्बजेलो मध असे आहे.
हा मध तयार होण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे. शरद ऋतूमध्ये फुलणाऱ्या कॉर्बजेलोच्या फुलांना फुलण्यासाठी विशेष हंगाम आवश्यक असतो. भरपूर पावसात बहरणारी ही फुले बेल म्हणजेच घंटेच्या आकाराची असतात. त्यामुळे मधमाशांना त्यात प्रवेश करण्यास खूप त्रास होतो. आणि त्यांना मध गोळा करणे कठीण जाते. एकीकडे या फुलांना बहरण्यासाठी अधिक पावसाची गरज असताना दुसरीकडे अतिवृष्टीमुळे मधमाशा पोळ्यातून बाहेर येऊन मध गोळा करू शकत नाहीत. तरीही अशा परिस्थितीत त्या मध तयार करतात. म्हणूनच कॉर्बेजेलो मध हा जगातील दुर्मिळ मधांपैकी एक आहे आणि त्याचे उत्पादन अगदी कमी प्रमाणात होते.

