ऐश्वर्या राय १९९४ साली मिस वर्ल्ड झाली आणि त्यानंतर ऐश्वर्याच ऐश्वर्या जन्माला आल्या.एकेकाळी शाळेच्या मुलांच्या यादीवर नजर टाकली तर त्यात जास्तीतजास्त गर्दी 'सचिन'ची असायची. पण हे काही नवे नाही.आधीच्य्य पिढीतही मुलांची नावं नेहरू आणि राजकपूर ठेवलेली आढळतात.थोडक्यात सांगायचं तर आवडत्या व्यक्तीचं नाव आपल्या मुलाला देणं ही फारच जुनी फॅशन आहे.
पण ही सगळी नावं भारतीय 'सेलेब्रिटी' सोबत जोडलेली आहेत.आज आपण अशा एका रशियन माणसावद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे युरी गागारीन -जगातला पहिला अंतराळवीर ज्याने १२ एप्रील १९६१ रोजी व्होस्टोक नावाच्या यानातून अंतराळात झेप घेऊन पृथीभोवती अंतराळात पहिली प्रदक्षिणा पूर्ण केली होती ! त्यानंतर अनेक वर्षं अनेकांनी आपल्या मुलाचं नाव गागारीन ठेवलं होतं. काहीजणांनी तर आपली आडनावं बदलून गागारीन हे आडनाव धारण केलं होतं.काल युरी गागारीनचा जन्मदिवस होता,या निमित्ताने आपण चाळून बघू या भारताचे युरी गागारीन कनेक्शन !





