सध्या भारतात अल्लू अर्जुनचा पुष्पा हा सिनेमा धुमाकूळ घालत आहे. यातील गाणी, डायलॉग्स प्रत्येक गोष्ट सुपरहिट झाली आहे. बॉक्सऑफिसवरील कमाईच्या बाबतीत हा सिनेमा सर्वात पुढे आहे. या सर्वांबरोबर अजून एक गोष्ट तितकीच सुपरहिट आहे ती म्हणजे ज्या गोष्टीवर आधारीत हा सिनेमा आहे ते रक्तचंदन!!!
स्मगलिंग आणि भारतीय सिनेमे यांचे नाते नवे नाही. कधी सोने कधी ड्रग्स स्मगलिंग आणि त्यातून जन्म घेणारी गुन्हेगारी हे बॉलिवूडचे फेव्हरिट विषय आहेत. पण पुष्पा सिनेमात ज्या रक्तचंदनची तस्करी दाखवली आहे. ही खरी तस्करी आहे. सोन्यापेक्षा कैक पट हे रक्तचंदन महत्वाचे समजले जाते. पैसे काय झाडावर उगतात का असा डायलॉग कुणीही फेकतो. पण हे झाड खरोखर पैसे उगवते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
रक्तचंदनला परीस म्हटले जाते. ज्याच्या हाती हे लागले त्याचे दिवस बदललेच म्हणून समजा. हे रक्तचंदन तसे तीन रंगामध्ये उपलब्ध असते. पांढरा, पिवळ्या आणि लाल. पण लाल रक्तचंदन हे इतर दोघांच्या मानाने अनेकपटीने महत्वाचे समजले जाते. म्हणूनच याला लाल सोने असेही म्हटले जाते. पिवळ्या चंदनाचा वापर वैष्णव करतात, तर लाल चंदन शैवपंथी वापरतात. या चंदनाचे वैज्ञानिक नाव Pterocarpus Santalinus असे आहे.


