देशात कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे. इंजिनिअरिंग, एमबीए सारख्या डिग्र्या घेऊन लोक दारोदार नोकऱ्या मिळतात का यासाठी फिरतात असे चित्र आहे. यावर उपाय म्हणून पाश्चात्य देशांसारखी स्टार्टअप संस्कृती भारतात वाढावी यासाठी खासगी आणि सरकारी स्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत.
भारतात खरं बघायला गेले तर मुलांमध्ये क्षमता नाही असे नाही. पण आयडिया आहे, तर पैसा नाही. पैसा जुळवला तर इतर संसाधने नाहीत यातच अनेक तरुणांचे टॅलेंट वाया जाताना दिसते. गेल्या काही वर्षांत अनेक सामान्य घरातील होतकरू तरुणांनी आगळ्यावेगळ्या आयडिया घेऊन स्वत:ला सिद्ध केले आहे. सोनी टिव्हीवर सध्या एक शो सुरू आहे. शार्क टॅंक इंडिया असे त्या शोचे नाव. त्यांची थीम अशी आहे की ज्यांच्या जवळ चांगल्या बिजनेस आयडिया असतील त्यांनी शोमध्ये बसलेल्या उद्योजकांना त्या सादर कराव्या, ज्यांना ही आयडिया आवडली ते या बिजनेसला निधी पुरवतील असे साधे सोपे सूत्र यामागे आहे. हा शो अमेरिकेत २००९पासून चालू आहे आणि यावर्षीपासून भारतात चालू झाला आहे.
परवाचा दिवस मात्र भन्नाट होता. या शोवर आलेल्या एका पठ्ठ्यामुळे हा शो ज्यांना माहीत नव्हता, त्यांनाही माहीत झाला आहे. जुगाडू कमलेश हे नाव कदाचित तुम्ही युट्यूबवर बघितले असेल. या जुगाडू कमलेशचे खरे नाव आहे, कमलेश नानासाहेब घुमरे!!! आपल्या मालेगावजवळील देवारपाडे या खेड्यात राहणारा हा अवलिया भविष्यातील बिग शार्क बनण्यासाठी तयार झाला आहे.

