कोणे एके काळी 'आयते कपडे' - रेडीमेड -कपडे म्हटलं की आई नाकं मुरडायची आणि बाबांच्या कपाळावर आठी उमटायची. आयते कपडे म्हणजे हलक्या दर्जाचे, तर शिंप्याकडून शिवून घेतलेले म्हणजे उत्तम दर्जाचे असा समज होता. नंतरच्या काळात शिंपी महाग झाले आणि रेडीमेड कपडे परवडायला लागले. त्यानंतर 'लेबल' या प्रकाराला महत्व आले. तुम्ही कोणत्या कंपनीचे -कोणत्या फॅशन डिझायनरचे कपडे वापरता यावर सामाजिक प्रतिष्ठेचे मोजमाप व्हायला सुरुवात झाली. मुंबईत तर एकेकाळी 'श्रीमंतासाठी चरागदिन आणि गरीबांसाठी केंब्रिज' असे म्हटले जायचे. ग्लोबलायझेशन झाले आणि युरोप-अमेरिकेतले मोठमोठे ब्रँड भारतात मिळायला सुरुवात झाली. आता तर यापुढची पायरी आपण गाठली आहे आणि अनेक भारतीय फॅशन डिझायनरच्या' लेबल'ला आंतराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
थोडक्यात, आता कपड्याचा धंदा 'लेबल'वर चालतो! लेबलची किंमत त्याच्या निर्मितीमागे कोण फॅशन डिझायनर आहे यावर ठरते!
गेल्या काही वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचा पसारा अनेक क्षेत्रात वाढलेला आहे. लोकांना माहीतही नाहीत इतक्या गोष्टींमध्ये रिलायन्सची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक आहे. आता तर डिझायनर कपडे आणि फॅशन इंडस्ट्रीतदेखील रिलायन्स कोट्यवधी रुपये ओतून उतरली आहे. एकेकाळी रिलायन्सचे'ओन्ली विमल' हे आम जनतेसाठीचे लेबल होते. ते दिवस आता संपलेत. धीरुभाई अंबानीची 'ओन्ली विमल' कंपनी आता नव्या दिशेने जाते आहे.
धंदा नव्याने उभी करण्याची पध्दत आता बदलली आहे. धागा ते कपडा एकाच छताखाली बनवण्याचे दिवस गेले आहेत. एखादे 'लेबल' बाजारात उभे करण्यापेक्षा एखादे लेबल ताब्यात घेऊन म्हणजे अॅक्वायर करून रातोरात धंदा मोठा करण्याची स्ट्रॅटेजी सध्या जोरात चालते आहे. अशाच एका सौद्यात मुकेश अंबानींची मुलगी इशा अंबानीने अनामिका खन्ना या महिलेला थेट ६० टक्के पार्टनरशिप देऊन आपल्यासोबत घेतले आहे.

