हवामान बदलाचा परिणाम म्हणून आता समुद्रातील पाण्याचा स्तर वाढत आहे. चक्रीवादळ, त्सुनामी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, ढगफुटी, महापूर, वणवा असे हवामान बदलाचे गंभीर परिणाम आता संपूर्ण जगाला भेडसावत आहेत. समुद्र किंवा नदीकिनारी राहणाऱ्या लोकांना पुराच्या पाण्याचा फटका बसण्याचे प्रमाण वाढले आहे. दिवसेंदिवस या सगळ्या समस्या तीव्र होत असताना यावर उपाय योजण्याचे प्रयत्नही तितक्याच वेगाने सुरू आहेत.
दक्षिण कोरियात पाण्यावर तरंगणारे शहर वसवण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०२५ पर्यंत तिथे पाण्यावर तरंगणारे हे शहर लोकांना राहण्यासाठी तयार असेल असा अंदाज आहे. पाण्यावर तरंगणारे हे शहर नेमके कसे असणार आहे, जाणून घेऊया या लेखातून.
दक्षिण कोरियाच्या बुसान किनाऱ्यावरील समुद्रात हे तरंगणारे शहर वसवले जात असून संयुक्त राष्ट्रसंघाने देखील या प्रकारच्या शहराला मान्यता दिली आहे. समुद्रात वसलेले हे पहिलेच शहर असणार आहे. या शहरातील इमारतीचे बांधकाम अशा पद्धतीने केले जाणार आहे, ज्यामुळे त्यांच्यावर पूर, त्सुनामी किंवा चक्रीवादळांचा काहीही परिणाम होणार नाही. या संकल्पित शहराचा पाण्यावरील पृष्ठभाग हा प्रोफॅब्रिकेटेड असणार आहे. पाण्याची पातळी जशी वाढेल तसा हा पृष्ठभाग पाण्यासोबतच वरती जाईल आणि पातळी कमी झाली की पाण्यासोबतच खाली येईल. फक्त १०,००० लोकांनाच राहण्यास हे शार अनुकूल असेल.


