पूजेनंतरच्या आरत्या धमाल आणतात. घरातले सगळेजण जमलेले असतात , लोकांना एकामागून एक आरत्या म्हणायला स्फुरण चढतं आणि एक मस्त माहौल बनतो.
इथं एकाच घरातले सगळे असले तर ठीक, पण दुसरीकडचं कुणी असेल तर आरत्यांचे शब्द पुढेमागे होतात आणि जाम गोंधळ होतो. आरतीच्या शेवटापर्यंत शब्द जुळून जातात. पण खरी मजा येते चुकीच्या आरत्या म्हणणार्यांमुळे. गेल्या आठवड्यापासून या चुकीच्या आरत्यांचे इतके फॉरवर्ड्स आले की बोभाटाला त्यांची दखल घेणं आज भाग पडलंय.
तर लोक काय-काय चुकीचं म्हणतात? पाहूयात काही नमुने...
१. दास रामाचा वाट पाहे सजणा..
दास रामाचा वाट पाहे ’सदना’च्या ऐवजी त्याचा सजणा केल्यानं, ’रामदास गणपतीची घरी वाट पाहताहेत’ या वाक्याचा अर्थ भलताच होऊन बसलाय.
२. दर्शनमात्रे मन, स्मरणेमात्रे मन, श्रावणेमात्रे मन
गणपतीची आरती इतकी पॉप्युलर आहे की जास्तीत जास्त चुका लोक याच आरतीत करतात. एकतर त्यात स्वत:ची भर घालतात. खरी ओळ आहे;- " दर्शनमात्रे मनकामना पुरती" म्हणजेच फक्त दर्शन झालं की मनातल्या इच्छा पूर्ण होतात. मग कुणाच्यातरी लक्षात आलं की दर्शनासाठी समोर देव हवा. फक्त देवाचं स्मरण केल्यानंही मला हवं ते मिळायला हवं म्हणून आधी स्मरणेमात्रे आणि मग दुसर्याच्या स्मरणाचं पुण्य का मला मिळून नये? म्हणून दुसर्याच्या भक्तीचं श्रवण केलंतरी माझ्या मनातल्या पूर्ण कर असं म्हणून ’श्रवणेमात्रे’ पण त्यात ऍड झालं. त्या श्रवणेमात्रेच्या ठिकाणी बरेचदा ’श्रावणेमात्रे’ ऐकू येतं बरं का. बिचार्यांना श्रावण महिन्यात येणार्या गणपतीबद्दल काहीतरी म्हणायचं असेल.
३. लंबोदरपीतांबर फळीवर वंदना
ही फळीवरची वंदना आजकालच दिसायला लागलीय बरं का.. त्या ’फणीवर बंधना’चा अपभ्रंश होऊन तिची फळीवरची वंदना झालीय. तिला खाली आणायला या वर्षी हाती आरतीचं पुस्तक हवंच हवं.
४. संकष्टी पावावे
ही ओळ म्हणजे सगळ्या आरत्यांत कळस आहे. शंभरातले नव्वद लोक तरी संकष्टी पावावे म्हणतात.
५. दीपक जोशी नमोस्तुते
हा मात्र कुणाच्यातरी सुपिक डोक्यातून निघालेला विनोद दिसतोय. की तुम्हाला भेटलाय कुणी, दिपक जोशी नमोस्तुते म्हणणारा प्राणी?
६. लवतवती विक्राळा
लवथवती विक्राळाच्या ऐवजी लवतवती म्हणणारे बरेचजण आजवर भेटलेयत.
तर मंडळी, यांतल्या किती चुका तुम्ही यापूर्वी ऐकल्या आहेत? आणि हो, अशा आणखी काही गंमतीदार आरत्या असतील तर त्या आमच्यासोबत नक्की शेअर करा..
