टेस्लाचे पहिले भारतीय कर्मचारी आणि टेस्ला ऑटोपायलट विभागाचे प्रमुख- अशोक इल्युस्वामी!!

टेस्लाचे पहिले भारतीय कर्मचारी आणि टेस्ला ऑटोपायलट विभागाचे प्रमुख- अशोक इल्युस्वामी!!

एलॉन मस्क या जगातील लोकप्रिय उद्योजकाची टेस्ला कंपनी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीची संकल्पना वेगळी असल्याने त्याभोवती वलय असणे साहजिक आहे. टेस्ला कंपनीत काम करण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. टेस्ला कंपनीत अनेक भारतीयही काम करतात. टेस्लातील एका भारतीय कर्मचाऱ्याबद्दल मात्र स्वतः एलॉन मस्कने माहिती दिली आहे.

एलॉन मस्क आपल्या कुल स्वभावासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर तो नेहमी सक्रिय असतो. सोशल मीडियावरूनच लोकांना नोकरी देणे हे ही त्याच्यासाठी नविन नाही. एलॉन मस्कने नुकतेच सांगितले की टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीच्या ऑटोपायलट प्रकल्पासाठी काम करणारे अशोक इल्युस्वामी हे पहिले कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे अशोक हे या ऑटोपायलट प्रकल्पाचे प्रमुख आहेत. अशोक आणि त्यांच्या टीमचे कौतुक करताना मस्कने सांगितले की, 'टेस्ला ऑटो पायलट टीम प्रचंड कार्यक्षम असून, जगातील सर्वाधिक स्मार्ट लोकांमध्ये त्यांची गणना होऊ शकते.'

एलॉन मस्कने नुकतेच एक ट्विट करत टेस्लासाठी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनिअरच्या शोधात असून, लोकांच्या समस्यांशी निगडित गोष्टी सोडविण्याची आवड असणारे हे इंजिनिअर हवेत अशी त्याची मागणी होती. यासाठी ऍप्लिकेशन पद्धतही सोपी होती. आपले नाव, मेल आणि केलेले काम पीडीएफ फॉरमॅटमध्ये कमेंटमध्ये पोस्ट करायचे होते. या सर्व लोकांमधून मस्कने अशोक यांची निवड केली यावरून अशोक यांचे कर्तृत्व सिद्ध होते.

अशोक इल्युस्वामी यांनी चेन्नईच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गिंडी इथे पदवी शिक्षण घेतले आहे. हे कॉलेज आशियातल्या सर्वात जुन्या तंत्रशिक्षण कॉलेजेसपैकी एक आहे. पुढे ते मास्टर्स करण्यासाठी कार्नेगी मेलन विद्यापीठात गेले. शिक्षण पूर्ण करून झाल्यावर त्यांनी फॉक्सवोगन इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅब आणि वॉबको व्हेहिकल कंट्रोल सिस्टम येथे काम केले होते.

उदय पाटील