अमेरिकन शाळे च्या तोडीस तोड उत्तरप्रदेशातल्या खेड्यातली सरकारी शाळेतली प्रयोगशाळा!!

लिस्टिकल
अमेरिकन शाळे च्या तोडीस तोड उत्तरप्रदेशातल्या खेड्यातली सरकारी शाळेतली प्रयोगशाळा!!

शाळांमधील प्रयोगशाळा बघितल्या तर या प्रयोगशाळेत प्रयोग करून शास्त्रज्ञ कसे घडतील हा प्रश्न प्रत्येकाला पडत असावा. आता हळूहळू प्रयोगशाळा आधुनिक करण्याचे प्रयत्न होत असले तरी अजूनही मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे. पण उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील अस्ट्रोनॉमी प्रयोगशाळा बघितली तर ही अमेरिकेतील एखाद्या शाळेतील प्रयोगशाळा वाटल्याशिवाय राहणार नाही.

अशोका युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या आर्यन मिश्रा नावाच्या एका विद्यार्थ्याच्या नजरेत ही प्रयोगशाळा आल्यावर त्याने या प्रयोगशाळेचा फोटो आणि माहिती ट्विटरवर शेयर केली आहे. आर्यन म्हणतो की जेव्हापासून ही प्रयोगशाळा सुरू झाली तेव्हापासून विद्यार्थ्यांचा या शाळेकडे ओढा वाढला आहे. एकाच महिन्यात १२ विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश केला आहे.

बुलंदशहर जिल्ह्यातील सांवली या गावातील शाळेत ही प्रयोगशाळा आहे. आर्यन मिश्रा असेही म्हणतो की या प्रयोगशाळेमागील हेतू हा मुलींनी अधिकाधिक प्रमाणात विज्ञान विषयात रस घ्यावा हा आहे. या प्रयोगशाळेचा अस्तित्वात आल्यापासुनच दिसायला लागला आहे.

 

 

त्याने एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे, ज्यात मुलं हौसेने स्पेस मॉडेल्स सोबत खेळताना दिसत आहेत. यामुळे लहान मुलांमध्ये अनोख्या पद्धतीने विज्ञानाबद्दल ओढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्तर प्रदेशात आजही पुरुषांमधील साक्षरता दर हा ७९.२४ टक्के तर महिलांमध्ये हा दर ५९.२६ टक्के आहे. यावरून या राज्यातील शिक्षणाच्या स्थितीचा अंदाजा लावता येऊ शकतो.

ही प्रयोगशाळा बघून कुणालाही अशी प्रयोगशाळा प्रत्येक गावात असावी असे वाटू शकते हेच या प्रयोगशाळेचे खरे यश आहे.

उदय पाटील