महाभारतातील एक महत्वाचा प्रसंग ज्यात पांडव हे कौरवांनी बांधलेल्या महालात राहायला जातात. हा महाल म्हणजे पांडवांना मारण्यासाठी तयार केलेला ‘मास्टर प्लॅन’ असतो. या घराला लक्षागृह म्हटलं जातं. याची निर्मिती ‘लाख’ पासून केलेली असते आणि म्हणूनच ते लवकर पेट घेतं. अश्या पद्धतीने पांडवांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न कौरव करतात पण सुदैवाने पांडवांना हे लक्षात येऊन ते त्या महालातून सुखरूप बाहेर पडतात. यावेळी ते एका गुप्त भुयारी मार्गाने बाहेर पडतात असा महाभारतात उल्लेख आहे.
आता महाभारत हजारो वर्ष जुनं असलं तरी असं म्हटलं जातं की हा भुयारी मार्ग आजही शाबूत आहे. याच भुयारातून कधीकाळी पांडव गेले होते. हे ठिकाण भारतातील महत्वाच्या पुरातत्व स्थळांपैकी एक आहे. या जागी आता उत्खनन होऊन काही गुपिते बाहेर पडण्याची शक्यता आहे. चला तर याबद्दल आणखी जाणून घेऊ !!
तर, उत्तर प्रेदेश, बागपत जवळील 'बरनावा' नामक गावी हे भुयार आहे. बरनावा हे नावच मुळात ‘वर्णाव्रत’ या महाभारत कालीन नावाचा अपभ्रंश आहे. वर्णाव्रत हे त्या पाच गावांपैकी एक आहे ज्या गावांची मागणी पांडवांनी केली होती. मेरठ येथील ‘हस्तिनापुर’ पासून ६६ किलोमीटरवर ही जागा आहे.
पुरातत्वशास्त्रज्ञ आणि स्थानिक इतिहासकारांच्या विनावाण्यांवरून ‘भारतीय पुरातत्व खात्याने’ बरनावा मध्ये उत्खनन करण्यास परवानगी दिली आहे. उत्खननाचे काम डिसेंबर मध्ये सुरु होईल. तीन महिने हे काम सुरु असणार आहे आणि यात 'इन्स्टिट्यूट ऑफ आर्किऑलॉजी'चे विद्यार्थीसुद्धा भाग घेणार आहेत.
ही जागा महाभारतकालीन आहे याला दुजोरा देणारी एक घटना २०१४ साली घडली. पुरातत्वशास्त्रज्ञ 'अमित राय' यांना ‘चंद्रायन’ गावाजवळ राजाचा मुकुट सापडला होता. शिवाय जवळच असलेल्या ‘सिनोली’ गावात हडप्पा संस्कृती काळातील अवशेष सापडले असल्याने बरनावा गावाचे महत्व वाढले आहे.
एवढ्या सगळ्या ऐतिहासिक ठिकाणांनी वेढलेल्या गावात उत्खननातून कोणती गुपिते बाहेर पडतायत ते बघण्यासारखं असेल !!


