काही माणसांचं या जगातून जाणं अनेकांसाठी चटका लावून जाणारं असतं. अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे यापैकीच एक. सिस्टीममध्ये राहून सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न करणारा द्रष्टा आणि संवेदनशील राजकारणी म्हणून जग त्यांना मानतं. लोकशाहीबद्दलची त्यांची तत्त्वं जग आजदेखील अनुसरतं. त्यांच्या कारकिर्दीत अमेरिकेत घडलेल्या सिव्हील वॉर(अमेरिकन यादवी युद्ध)ची परिणिती त्यांच्या हत्येत झाली. हे युद्ध इतिहासातील सर्वाधिक रक्तरंजित युद्धांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. लिंकन यांच्या हत्येने जगाने एक उत्तम राजकारणी गमावला. अजून काही काळ हयात असते तर कदाचित अमेरिकेत कृष्णवर्णीयांना जास्त अधिकार मिळाले असते आणि अमेरिकेचं चित्रही वेगळं दिसलं असतं. पण तसं व्हायचं नव्हतं.
लिंकन यांचा जन्म १८ फेब्रुवारी १८०९चा. जवळपास २०० वर्षांपूर्वीचा. तेव्हा अमेरिकेत गुलामगिरी मोठ्या प्रमाणावर होती आणि त्याच्याच जोडीला टोकाचा वंशवाद होता. आफ्रिकन कृष्णवर्णीय लोकांकडे गोरे हीन दृष्टीनेच बघत असत. त्यावेळी अमेरिकेच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये कापसाची शेती केली जात असे आणि त्या शेतांत राबण्यासाठी आफ्रिकेतून लोक गुलाम म्हणून नेले जात. तिथे त्यांना अत्यंत कष्टाची कामं करावी लागत. शिवाय त्यांना कोणत्याही सोयीसुविधा किंवा अधिकार नव्हते. तुटपुंज्या मजुरीच्या बदल्यात त्यांना भरपूर कष्ट करावे लागत. गुलामगिरीचे हे प्रमाण उत्तरेकडील राज्यांच्या तुलनेत दक्षिणेकडील राज्यांत जास्त होते. या दक्षिणेकडील राज्यांना कॉन्फेडरेट स्टेट्स असं म्हणत.



