गॉडफादर सिनेमा पन्नास वर्षांचा होतोय. या सिनेमाबद्दल लिहावं तितकं कमी आहे.
या चित्रपटाने समाजाच्या मनात अप्रत्यक्ष आणि अनपेक्षित बदल घडवून आणले. त्यापैकी एक बदल म्हणजे गॉडफादर या धार्मिक शब्दाला एक वेगळाच अर्थ मिळाला. अमेरीकेच्या राजकारणावर -अर्थकारणावर ज्यांचा प्रचंड प्रभाव होता अशा संघटीत गुन्हेगारी टोळ्यांच्या इतिहासावर आधारीत हा चित्रपट होता. या संघटीत गुन्हेगारी जगताच्या प्रमुखाला 'गॉडफादर' हा नवा रंग या चित्रपटाने दिला. अगदी आपल्याकडे एखाद्या गुंडाला 'भाई' म्हणण्याची फॅशन आली तसंच. थोडक्यात गुन्हेगारीच्या विश्वाचं 'ग्लोरीफिकेशन' करणारा हा चित्रपट होता. या चित्रपटाने हॉलीवूडच बदलून टाकलं. त्यानंतर क्राईम स्टोरीजची जी भरती आली जी आजही कमी झालेली नाही.
त्या काळातला हा ब्लॉकबस्टर, सुपरडुपर हिट सिनेमा. १४ मार्च १९७२ रोजी तो रिलीज झाला. आता ५० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पॅरामाऊंट पिक्चर्स ही कंपनी त्याचं ऍनिव्हर्सरी व्हर्जन सादर करत आहे.
गॉडफादर ही एका माफिया कुटुंबाची गोष्ट. त्यामुळे तशी ही क्राईम फिल्म. पण सिनेमा पाहताना प्रेक्षकांनी याकडे क्राइम फिल्म म्हणून बघितलंच नाही. उलट हा सिनेमा इतका गुंतवून ठेवतो, की त्यातल्या डॉनबद्दल देखील एका टप्प्यावर नकळत सहानुभूती वाटायला लागते.
यामध्ये डॉन व्हिटो नावाचा एक माफिया गॉडफादर आहे. त्याला तीन मुलं आहेत. आपला वारसदार म्हणून तो सगळ्यात थोरल्या मुलाकडे पाहतो. त्याची बाकीची दोन मुलं त्याने सुसंस्कृत आणि शांतताप्रिय वातावरणात, गुन्हेगारी विश्र्वापासून लांब वाढवली आहेत. त्यांचं जीवन सामान्य माणसांसारखं असावं असा त्याचा आग्रह आहे. सगळं व्यवस्थित चालू असताना मध्येच कथेतला ट्विस्ट येतो. माफिया कुटुंबांमध्ये युद्ध सुरू होतं आणि अशी परिस्थिती निर्माण होते की सगळ्यात धाकट्या मुलाला- मायकलला- या लढाईत भाग घ्यावा लागतो. तो अर्थातच स्वेच्छेने तसं करतो. यथावकाश हाच मुलगा आपल्या वडिलांची जागा घेतो आणि वडिलांपेक्षाही निष्ठुर, निर्दय, आणि थंड डोक्याचा निघतो. या नोटवर सिनेमा थांबतो.

