सिव्हील राईट्स मूव्हमेंट म्हणजेच मानवी हक्क चळवळ हा शब्द तुमच्या कधीतरी कानावर पडला असेल. वंशभेद, तसंच कृष्णवर्णीय आणि बिगर श्वेतवर्णीय यांच्यावर होणारा अन्याय यांच्या विरोधात अमेरिकेत ही चळवळ उभी राहिली. काळ्यांना गोऱ्यांच्या बरोबरीने अधिकार असावेत ही चळवळकर्त्यांची मागणी होती. या चळवळकर्त्यांमध्ये एक नाव आघाडीवर होतं : माल्कम एक्स. हा सिव्हील राईट्स चळवळीचा खंदा समर्थक आणि आफ्रिकन अमेरिकन राष्ट्रवादी नेता होता. वयाच्या अवघ्या एकोणचाळिसाव्या वर्षी त्याची हत्या झाली.
माल्कमचा जन्म अमेरिकेतल्या नब्रास्का इथला. त्याचे वडील बाप्टिस्ट धर्मोपदेशक होते आणि मार्कस गारवी या कृष्णवर्णीय नेत्याचे समर्थक होते. त्याबद्दल त्यांना
अनेकदा धमक्याही मिळाल्या होत्या, पण ते बधले नाहीत. पुढे माल्कम सहा वर्षांचा असताना एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात होता की जाणूनबुजून घडवलेला घातपात, हे शेवटपर्यंत समोर आलं नाही. माल्कम शाळेत जाण्याच्या वयाचा झाला. कुटुंबाची परिस्थिती अतिशय हलाखीची होती, तरी त्याने शिक्षण सुरू ठेवलं. मात्र आठवीत असताना एका शिक्षकांनी त्याला, "तू वकील होण्यापॆक्षा सुतारकाम कर" असा सल्ला दिला आणि झालं! त्याचा शाळेतला रस संपला. त्यानंतर लवकरच त्याने शाळा सोडली. त्यानंतर त्याने एक वेगळीच वाट धरली- गुन्हेगारीची.
१९४६ मध्ये तो २१ वर्षांचा असताना त्याला चोरीच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्यात आलं. तिथे एलिजाह मोहम्मद नावाच्या मुस्लिम नेत्याच्या तो संपर्कात आला. त्यावेळी या मोहम्मदची नेशन ऑफ इस्लाम नावाची संघटना होती. मोहम्मद कृष्णवर्णीयांच्या राष्ट्रवादाचा प्रसार करत असे. युरोपियन, अमेरिकन असे गोरे लोक त्याचे शत्रू होते. मोहम्मदच्या शिकवणुकीचा माल्कमवर सखोल परिणाम झाला. त्याच दरम्यान तुरुंगात त्याला त्याचा भाऊ भेटायला यायचा. त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. तोही नेशन ऑफ इस्लामचा सदस्य होता. या सगळ्यातून कृष्णवर्णीयांसाठी आपण काहीतरी करायला हवं हे माल्कमच्या मनाने घेतलं. त्यासाठी त्याने आधी स्वतःच स्वतःला शिक्षित करायचं ठरवलं. जोडीला आपल्या नावाच्या पुढे एक्स हे अक्षर जोडलं. त्याच्या हरवलेल्या आफ्रिकन अस्मितेचं प्रतीक म्हणजे हा एक्स.


