ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी आली आणि चाहत्यांना काळजी वाटू लागली. गेल्या दहा दिवांपासून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यास वेळ लागू शकतो असे डॉक्टरांनी सांगितले आहे. केवळ भारतातील नाही तर लता मंगेशकर यांचे जगभरात चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहेत.अशातच मुंबईच्या एका रिक्षा चालकाने देखील एका अनोख्या पद्धतीने लता दीदींच्या प्रकृती स्वास्थ्यसाठी प्रार्थना केली आहे. त्याने आपली संपूर्ण कमाई लतादीदी यांच्या उपचारासाठी दान केली आहे.
सत्यवान गीते असे त्या रिक्षाचालकाचे नाव असून तो लतादीदींचा खूप मोठा चाहता आहे. लतादीदींना तो देवी सरस्वती देवीचे रूप मानतो. जेव्हापासून लता मंगेशकरांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तेव्हापासून तो सतत त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करत आहे. लतादीदी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी प्रार्थना त्याने आपल्या रिक्षावरही लिहिली आहे. रिक्षावर त्याने लतादीदी यांचे फोटोही लावले आहेत. तसेच त्यांच्या गाण्याच्या ओळी त्याने रिक्षावर लिहिल्या आहेत.

