पावसाळा आणि हिवाळा यांच्या सांध्यावर येत असलेला ऑक्टोबर महिना अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक तर याच सुमारास सणासुदीचा काळ असतो आणि या काळातच शरद ऋतू आपले गुण दाखवत असतो. सणासुदीचा काळ हा आनंदाचा काळ असला तरीही शरद ऋतू तितकासा आनंददायक असत नाही. या काळात पाऊस थांबला असल्याने आणि थंडी पडायला वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात उकाड्याचा अनुभव येतो. यालाच आजच्या काळात ऑक्टोबर हीट असं म्हणतात. आयुर्वेदामध्ये या काळात पित्ताचा उद्रेक होतो असं सांगितलेलं आहे, यामुळे पित्ताचे विकार आणि उष्णतेचे विकार या दिवसात प्रामुख्याने बघायला मिळतात.
ऑक्टोबर हीटपासून बचाव करायचा असल्यास पुढील प्रकारे तो करता येणं शक्य आहे –
ऊसाचा रस, कोकम सरबत प्यावं

मोरावळा खावा
काळ्या मनुका, बेदाणे यांचा आहारात समावेश करावा

उकळत्या पाण्यात मूठभर धणे-जिरे टाकून ते पाणी थंड करून प्यावे

वाळ्याचं पाणी प्यावं

डोक्यावर तेल जिरवणं

गरम पाण्याने तोंड धुवून नाकपुड्यांमध्ये चार-चार थेंब साजूक तूप सोडावं

तळपायाला तूप लावून काशाच्या वाटीने चोळणं

रक्तदान करणं

ग्लासभर कोमट दूध, चमचाभर तूप आणि एक बत्तासा घालून प्यावं

दुपारच्या वेळी उन्हात फिरणं टाळावं

पांढरे, सुती कपडे वापरावेत

जेवणात कडू, गोड आणि तुरट पदार्थ वापरावेत

पोट नीट साफ होण्यासाठी आवश्यकता भासल्यास उपचार घ्यावा
ऑक्टोबर महिन्यात निसर्गतःच वातावरणातील विषार वाढतात. यामुळेच या काळात योग्य आहार-विहार पाळून राहिल्यास पित्ताच्या वाढण्याने निर्माण होणा-या लक्षणांपासून होणारा त्रास कमी करता येऊ शकतो. या दिवसात अगस्ति ता-याचा उदय होतो. अगस्ति ता-याचा उदय झाल्यावर वातावरणातील विषार कमी होऊ लागतो पण तोपर्यंत वरील उपायांनी ऑक्टोबर हीटमधला पित्ताचा त्रास आटोक्यात सहजपणे ठेवता येईल.
