ऑक्टोबर २८ ला रिलीज होणारे सिनेमे: दिवाळीत कोणता चित्रपट पाहणार?

लिस्टिकल
ऑक्टोबर २८ ला रिलीज होणारे सिनेमे: दिवाळीत कोणता चित्रपट पाहणार?

शाहरूखची दिवाळी, सलमानची ईद आणि आमीरचा ख्रिसमस.. असा प्रत्येकाने आपापला प्रेक्षकवर्ग वाटून घेतलाय. त्या-त्या वेळांना सिनेमा रिलीज करणार्‍या इतर निर्मात्यांच्या हाती जास्त काही पडत नाही. यावेळेस दिवाळीत शाहरूखचा सिनेमा नाही, पण त्याचा मित्र करण जोहरचा सिनेमा आहेच आणि त्याचसोबत आतापर्यंत ट्रेलरच्या चर्चांमुळे गाजलेला ’शिवाय’ ही. तसा ’ऐ दिल..’ ही आतापर्यंत काही कमी चर्चेत नाहीच. या आठवड्यात हेच दोन मोठे सिनेमे रिलीज होत असल्याने अजून तिसरं कुणी तितकंसं स्पर्धेत नाहीय. त्यामुळं या दोघांचीच चुरस आहे. 

पाहूयात दोन्ही सिनेमांच्या पारड्यात या दिवाळीच्या सुट्टीत काय आहे ते!

ऐ दिल है मुश्किल

हा सिनेमा किती कारणांनी चर्चेत आहे याला मोजदाद नाहीच. पाकिस्तानी कलाकार, उरी घटनेचा निषेध तर आहेच आणि आता त्याला एक नवीन वळण मिळालंय- मनसेनं त्यांना रिलीज होण्यासाठी घातलेल्या अटींचं.  यावरून हे तरी किमान सिद्ध झालं की त्यातला फवाद खानचा भाग दुसर्‍या कलाकाराला घेऊन रिशूट केल्याच्या बातम्या खोट्या होत्या. आता नाही म्हणायला रणबीर-ऐश्वर्याचे फोटो सगळीकडे फिरताहेत. पण त्या दोघांच्या जोडीला पाहायला कुणी खास थेटरात जाईल असं वाटत नाही.

करण जोहरच्या फेसबुक अकाऊंटवर आणि व्हॉटसऍपवरच्या फॉर्वर्डमध्येही लोक पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा बनवल्याबद्दल त्याला बोल लावत आहेत. पण तुम्हाला माहित आहे ना? पब्लिकचं काही खरं नसतं. ’बघू नका’ म्हणून सांगणारेच ’ऐ दिल..’ची तिकिटं काढताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. 

शिवाय

’ऐ दिल..’ बघू नका म्हणून सांगणारे ’शिवाय’ पाहा असा सल्ला देत आहेत. तुम्ही ट्रेलर पाहिलंय ’शिवाय’चं? तुम्हांला त्यातून सिनेमा कशाबद्दल आहे, किमान का पाहावा किंवा का पाहू नये हे कळालं असेल तर आम्हांलाही सांगाच. 

एका बाजूला बर्फाळ हिमालय आणि दुसर्‍या बाजूला परदेशात होणारी ’रोहित शेट्टीछाप’ गाड्या उडवू मारामारी या पलिकडं या ट्रेलरमध्ये काही नाही. अजय देवगण तसा बरा अभिनेता आहे. पण त्यानंही ’शिवाय’च्या निमित्तानं करण जोहरसोबत वाद ओढवून घेतला होता.

आता बघा बुवा, ठरवा तुम्हीच.. कुठला सिनेमा पाहायचा ते..