गेले 2- 3 दिवस समुद्रात दिसत असलेल्या आगीची चर्चा आहे. समुद्रात आग लागणे ही काय नेहमीची गोष्ट नाही. साहजिकच या विषयाबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. यामागे असणारी कारणे आता बाहेर येऊ लागली आहेत.
कॅस्पियन समुद्राजवळ पूर्वी रशियात आणि आता स्वतंत्र असलेला अझरबैजान नावाचा देश आहे. फॉर्म्युला वन रेसेस पाहात असाल तर हा देश तुम्हांला माहित असण्याची शक्यता आहे. या अझरबैजानच्या प्रचंड मोठ्या गॅस आणि तेल भांडाराजवळ मोठा स्फोट झाला. आगीच्या ज्वाळा तिथून निघताना दिसत होत्या. हा स्फोट चिखलाच्या ज्वालामुखीमुळे झाला असल्याचे आता समोर येत आहे. कॅस्पियन समुद्रात असे अनेक चिखलाचे ज्वालामुखी आहेत. आपल्याला नेहमीचे लाव्हारसाचे ज्वालामुखी माहित असतात. पण हे चिखल ज्वालामुखी काय आहेत?
थोडक्यात सांगायचं तर चिखल ज्वालामुखीतून माती आणि ज्वलनशील गॅस बाहेर पडत असतात. मड वॉल्केनो हा नावाप्रमाणेच चिखलाशी संबंधित आहे. हा चिखल जमिनीखाली पाणी खनिजे आणि ज्वलनशील गॅसेसचा बनलेला असतो. इतर ज्वालामुखीत आणि या ज्वालामुखीत असलेला फरक म्हणजे हा ज्वालामुखी इतर ज्वालामुखीप्रमाणे आग न ओकता जमिनीखालील तप्त पाणी, खनिजे खडके यांचे मिश्रण करून चिखल रुपात बाहेर फेकत असतो

