आता राखी आणि सलमान टीव्हीवर आम्ही कसे ’व्हर्जिन’(?) म्हणून डंका पीटत असताना हा कोण गाढव आहे की जो, "आय ऍम नॉट व्हिर्जिन " असं सांगत फिरतोय, असा प्रश्न पडला ना? थांबा मग जरा..
घरातल्या वापरात नसलेल्या जुन्या कपड्यांचे करायचे काय हा प्रश्न कधी ना कधी प्रत्येकालाच पडतो . मग हे कपडे बोहारणीला देऊन त्या बदल्यात घरच्या वापराची भांडी घेण्याचा पर्याय अनेकजण निवडतात. पण त्यात पुन्हा घासाघीस करायला लागते आणि ढीगभर कपडे नेऊन ती बया नुसती एखादी वाटी नाहीतर नुसती पळीच हातात ठेवते तेव्हा चिडचिड होते.
परंतु मुंबईतील एका अवलियाला मात्र हा पर्याय काही फारसा आवडलेला दिसत नाहीय . मुंबईतल्या जयदीप सचदेव यांनी वापरलेल्या जुन्या कपड्यांपासून शॉपिंग बॅग्ज बनवायला सुरूवात केली. या बॅग्ज जुन्या चादरी, नॅपकीन व टेबल क्लाॅथपासून बनविल्या जातात. जुन्या, वापरलेल्या कपड्यांचा डाग नसलेला भाग योग्य आकारात कापून त्यावर नक्षीदार छाप मारून त्यापासून बॅग्ज शिवल्या जातात. स्कूल बॅग्ज, हॅण्डबॅग्ज, शॉपिंग बॅग्ज पाण्याची बाटली ठेवण्यासाठी बॅग्ज अशा अनेक प्रकारच्या बॅग्ज चा यात समावेश आहे.
कित्येक बॅग्जवर ' I am not a virgin' असे लेबल छापलेले असते. या वरून ही बॅग जुन्या, वापरलेल्या कपड्यांपासून बनवली आहे हे समजते. पर्यावरण विषयक जागृतीसाठीच्या या अभिनव कल्पनेला खरंच मानलं बुवा!
