फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याची कमाल!! केरळमधली फुगे विकणारी मुलगी मॉडेल झालीय पाहा!!

फोटोग्राफी आणि कॅमेऱ्याची कमाल!! केरळमधली फुगे विकणारी मुलगी मॉडेल झालीय पाहा!!

काही दिवसांपूर्वी केरळमधल्या एक मजूर माम्मीकांचा मजूर ते मॉडेल हा प्रवास वाचला होता. फोटोशूटमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूराचे मॉडेलिंग करिअर असे चालू झाले आहे!

आता केरळमधल्याच एका फुगे विकणाऱ्या मुलीचे नशीब असेच उघडले आहे. केरळ येथे अंदलूर येथील कावू फेस्टिव्हलमध्ये फुगे विकताना या मुलीला अर्जुन कृष्णन या फोटोग्राफरने बघितले. त्यांनी तिथेच तिचे काही फोटो काढले. किसबु नावाच्या या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला वेळ लागला नाही.

हा फोटो व्हायरल झाल्यावर अनेक प्रोफेशनल फोटोग्राफर्सची तिच्या घरी झुंबड उडाली. स्वतः अर्जुन कृष्णन, रेम्या प्राजुल असे अनेक मोठे फोटोग्राफर्स तिला फोटोशूटसाठी ऑफर देऊ लागले. किसबु आणि तिची आई तर हा सर्व प्रकार बघून प्रचंड खुश झाले.

रेम्या प्राजुल यांच्यासोबत तिने फोटोशूट करायचे ठरवले. भल्या पहाटे ४ वाजता सर्व मेकअपसह तिचा पूर्ण चेहरामोहरा बदलला. या बदलेल्या लूकमधले किसबुचे फोटो बघून ही मुलगी खरोखर प्रोफेशनल मॉडेल आहे असेच कुणालाही वाटेल.

पारंपरिक कासावू साडी, सोन्याचे दागिने आणि परिपूर्ण मेकअप यातून किसबुचा पूर्ण अवतार बदलला. पण खरंतर या घटनेने तिचे पूर्ण आयुष्य बदलले असेच म्हणायला हवे.

उदय पाटील