रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगावरच तणावाचे सावट पसरले आहे. रशियाच्या आक्रमणाला आळा घालण्यासाठी जगातील सगळेच महत्वाचे देश सरसावले आहेत. अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्ध तर जगजाहीर आहे. त्यामुळे या युद्धात अमेरिका रशियाला जितके कोंडीत पकडता येईल तितके पकडण्याचा प्रयत्न करत आहे. अमेरिकेने युक्रेनला आर्थिक मदत तर केली आहेच. पण रशियाला रोखण्यासाठी इतके पुरेसे नाही. म्हणून युरोपीय देशांनी आणखी एक पाऊल उचलले आहे. ते म्हणजे रशियाच्या धनदांडग्या आणि स्वतःला सरंजामदार समजणाऱ्या (ज्याला इंग्लिशमध्ये ऑलिगार्क म्हटले जाते असे) उद्योजकांवर बंदी लादणे.
देशात आपलाच मनमानी कारभार चालवा म्हणून राजकारण्यांना मुठीत ठेवणारे धनदांडगे सर्वच देशात असतात. हे धनदांडगे राजकर्त्यांकरवी स्वतःला पूरक आणि पोषक ठरतील असे कायदे घडवून आणतात. इतरत्रही या लोकांचे अस्तित्व दिसत असले तरी रशियात मात्र यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यात पुतीन यांच्या मर्जीतील अनेक धनदांडग्या उद्योजकांनी आपल्या पदरात भरपूर दान पाडून घेण्यात यश मिळवलं आहे. पुतीन यांच्या कार्यकाळात अशा काही विशिष्ट उद्योजकांची भरपूर भरभराट झाली आहे.
२०१८ साली पुतीन यांनी क्रीमियाचा काही भाग बळकावल्यानंतर पुतीन यांच्यामुळे फायदा झालेले असे जे-जे बडे उद्योजक आहेत त्या सगळ्यांवर अमेरिकेने बंदी लादल्याचे अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने जाहीर केले. क्रीमिया काबीज केल्यापासूनच पुतीन यांनी युक्रेनमध्येही घुसखोरी सुरु केली.
