आधुनिक देशातल्या नाही, तर बांग्लादेशी खेड्यातल्या इमारतीला जगातील सर्वोत्तम बांधकामाचा पुरस्कार मिळालाय!! असं नेमकं काय आहे या वास्तूत?

आधुनिक देशातल्या नाही, तर बांग्लादेशी खेड्यातल्या इमारतीला जगातील सर्वोत्तम बांधकामाचा पुरस्कार मिळालाय!! असं नेमकं काय आहे या वास्तूत?

जगातली सर्वोत्तम बांधकाम कोणते, असे विचारले तर साहजिकच ऐतिहासिक वास्तू किंवा जागतिक ७ आश्चर्यांपैकी एखादे बांधकाम असे उत्तर येईल. पण आधुनिक युगात पाहिले तर असे कोणते बांधकाम तुम्हाला माहिती आहे काय? इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स (RIBA) यांनी नुकताच जगातील सर्वोत्तम इमारत असा पुरस्कार जाहीर केला आहे. यासाठी बांग्लादेशच्या ग्रामीण भागातील एका रुग्णालयाची जगातील सर्वोत्तम इमारत म्हणून निवड करण्यात आली आहे. २८ जानेवारीला याची घोषणा झाली. आज आपण याच म्हणजे जगातील सर्वोत्तम इमारतीविषयी जाणून घेऊयात.

बांगलादेशच्या ग्रामीण भागातल्या फ्रेंडशिप हॉस्पिटलला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स (RIBA) आंतरराष्ट्रीय पुरस्कार २०२१ देण्यात आला आहे. हे रुग्णालय सातखीरा जिल्ह्यात आहे. हे ८० खाटांचे रुग्णालय आहे. हे फक्त स्थानिक विटांचा वापर करून बांधले आहे. बांगलादेशी वास्तुविशारद काशेफ चौधरी यांच्या कल्पननेतून याची रचना केली गेली आहे.

विशेष म्हणजे हे रुग्णालय अतिशय कमी खर्चात बांधण्यात आले आहे. इथले भूजल क्षारयुक्त आहे. हे पाणी पिण्यास फारसे उपयोगी नाही. या इमारतीत पाहिल्यास आजूबाजूला पाणी आहे. उन्हाळ्यात इथे पाण्याची अडचण असते. त्यामुळे चौधरी यांनी इमारतीची रचना पावसाचे पाणी साठवण्यासाठी केली आहे. हे पाणी इमारतीच्या गच्चीवर तसेच आतल्या भागात जे कालवे बनवले आहेत त्यात साठवले जाते आणि मग तिथून वाहात दोन मोठ्या टाक्या बांधल्या आहेत त्यामध्ये साठते.

तसेच इथे प्रकाश आणि हवा खेळती रहावी म्हणून भिंतींची रचना केली आहे. उन्हाळ्यातही इथे वातावरण थंड राहते. आणि नैसर्गिक प्रकाश सर्व खोल्यांत पोहोचल्याने वीजही वाचते. फ्रेंडशिप एनजीओ हॉस्पिटल हे अनेक रुग्णावर उपचार करते. रुग्णांना औषधाची जशी गरज असते तसेच त्यांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे म्हणून स्वच्छ वातावरणाची गरज असते. या रुग्णालयात तसे वातावरण असल्याने ही इमारत उत्कृष्ट ठरते.

शीतल दरंदळे