ऑस्ट्रेलिया आणि एकूणातच क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वाईट म्हणून ओळखली गेलेली चेंडूफेक! या घटनेला ४१ वर्षं झाली!!

लिस्टिकल
ऑस्ट्रेलिया आणि एकूणातच क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वाईट म्हणून ओळखली गेलेली चेंडूफेक! या घटनेला ४१ वर्षं झाली!!

ग्रेग चॅपल हा कधीकाळी भारतीय संघाचा प्रशिक्षक राहिलेली व्यक्ती. या कारणाने भारतीय त्याला चांगलेच ओळखून आहेत. सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपल यांच्या वादामुळे गांगुलीला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. हा माणूस तसा पाताळयंत्री स्वभावाचा आहे हे एव्हाना भारतीयांना माहीत आहे. पण त्याचा हा स्वभाव काय आजचा नाही. अशाच एका उदाहरणासाठी तो कायमचा बदनाम झाला आहे.

१ फेब्रुवारी १९८१ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलँड सामना सुरू होता. त्यावेळी चॅपल हा ऑस्ट्रेलियन संघाचा कॅप्टन होता. सामन्याचा शेवटचा बॉल टाकायचा होता. या एका बॉलवर न्यूझीलँडला ७ धावा करायच्या होत्या. जर का त्यांनी सिक्स मारला असता तरच सामना बरोबरीत सुटून न्यूझीलँडची हार टळली असती.

बॉलिंग करण्यासाठी ग्रेगचा भाऊ ट्रॅव्हर चॅपल होता, तर कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा अजून एक भाऊ इवोन होता. ग्रेगने एक नामी युक्ती लढवली. त्याने आपला भाऊ ट्रॅव्हरला चक्क सरपटी बॉल टाकण्यास सांगितले. त्यामुळे सिक्स मारणे अशक्य होऊन बसेल.

त्याच्या या निर्णयाच्या विरुध्द सगळेच होते. पण ग्रेग सामना जिंकण्यासाठी उतावीळ होऊन बसला होता. त्याने ट्रॅव्हरला सरपटी बॉल टाकण्यास सांगितले. शेवटी हा बॉल खेळता न आल्याने ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. मात्र ग्रेग चॅपल चांगलाच टीकेचा धनी ठरला. तोपर्यंत असा बॉल टाकणे बेकायदेशीर ठरविण्यात आले नव्हते.

एकदा ऑस्ट्रेलियाचाच खेळाडू ग्लेन मॅकग्रा याने असाच सरपटी बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याला अंपायरने रोखल्याने त्याला हा बॉल टाकता आला नव्हता.

आज जरी सरपटी बॉलिंग टाकणे टाकणे ही कधीही न होणारी घटना असली तरी एकेकाळी सरपटी बॉल हीच क्रिकेटमध्ये सर्रास चालणारी बॉलिंग होती. हा प्रकार इंटरनॅशनल क्रिकेट सुरू होण्याच्या खूप आधी होत असे. या प्रकारामुळे बॅटिंग करणे हे अतिशय कठीण होऊन बसत असे. जवळपास १७६० च्या आसपास सरपटी बॉलिंग सोडून आतासारखी नॉर्मल बॉलिंग टाकण्यास सुरुवात झाली. तर १८६४ सालापासून अधिकृतपणे आतासारखी ओव्हरआर्म बॉलिंग ही टाकली जात आहे.

ग्रेग चॅपलने क्रिकेटच्या सुरुवातीच्या टप्प्यात जाऊन बघण्याचा प्रयत्न तर केला, पण यामुळे त्याला टीकाच सहन करावी लागली.

उदय पाटील

टॅग्स:

cricket

संबंधित लेख