एका शेतकऱ्याने देशाची सीमा कशी सरकवली? बेल्जियममध्ये काय घडलं आहे?

लिस्टिकल
एका शेतकऱ्याने देशाची सीमा कशी सरकवली? बेल्जियममध्ये काय घडलं आहे?

मधोमध कुंपण किंवा बांध घालून वेगळे केलेले शेतजमिनीचे तुकडे सर्रास आढळतात. त्यातही ते भाग एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या  शेतकऱ्यांचे असतील  तर ते दोघे एकमेकांची जागा वाढवण्यासाठी काहीतरी कुरापती करत राहतात. शेजारच्याला कळू न देता  कुंपण  सरकवून स्वतःच्या जमिनीचा भाग मोठा करण्याचा प्रकार तर सर्रास चालतो. परंतु जेव्हा दोन देश वेगळे होतात तेव्हा जी सीमा आखली जाते ती कोणी हलवू शकतो काय? आपल्या देशाची सीमा सरकवून कोणी आपला देश मोठा केलेला ऐकलंय काय? हा अजब प्रकार खरोखरंच घडलाय. चला पाहुयात हे घडलंय कुठे?

बेल्जियममध्ये अर्क्वेलिनेस हे खेडेगाव फ्रान्स आणि बेल्जियम सीमेलगतच आहे. त्या जवळच असलेल्या जंगलात एक  हौशी इतिहासकार फिरत होता. फिरताना सहज त्याच्या  लक्षात आले की शेजारील फ्रान्सच्या सीमेवर असणारा दगड जवळपास ७.५ फूटांनी हलविला गेला आहे. म्हणजे कोणीतरी बेल्जियमला ​​मोठा आणि फ्रान्सला छोटा बनवला आहे. त्याला ते पाहून विचित्र वाटले. त्याने स्थानिक अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून दिली. एक स्थानिक शेतकऱ्याकडून हे चुकून घडले असावे असा अंदाज आहे. त्याने शेतात ट्रॅक्टर चालवताना आणखी जागा तयार करण्यासाठी हा दगड हलवला असावा.

फ्रेंच सेनानी नेपोलियन याचा वॉटर्लू येथे पराभव झाला. त्यानंतर १८२० मध्ये कोर्ट्रिस्क करार झाला. या करारांतर्गत औपचारिकपणे ही सीमा आखण्यात आली. या दगडाचं म्हणाल तर त्यावर १८१९ वर्ष लिहिलेलं आहे. १८१९ साली पहिल्यांदा ही सीमा ठरवण्यात आली होती. फ्रान्स आणि बेल्जियमच्या मध्ये असलेली ही सीमा ६२० किलोमीटर इतकी लांब आहे.

अर्क्वेलिनेसचे महापौर डेव्हिड लॅवॉक्स यांनी सीमेच्या दगडाचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. त्यांनी फोटोला कॅप्शन देताना गंमतीत लिहिले आहे "आम्ही १८१९ ची सीमा हलवली". ते पुढे म्हणतात "हे प्रकरण फारसे गंभीर घेऊ नये. करारानुसार आम्ही पूर्वी जिथे दगड होता जिथे परत ठेवणार आहोत. आमचा हेतू बेल्जियमला ​​मोठा आणि फ्रान्स छोटा बनवण्याचा नव्हता!”

काही अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की हा दगड परत जागेवर नेऊन ठेऊ शकतो. त्याला काही अडचण येणार नाही. तो स्वतः काही हलणार नाही. परंतु जर हा दगड परत हलवला आहे, असे आढळल्यास त्या शेतकऱ्यावर कारवाई होऊ शकते. अर्थात आता तो शेतकरी अशी हिंमत पुन्हा करेल असे वाटत नाही. 

सध्या तरी हे प्रकरण इथेच मिटले आहे. पुढील तपासात अजून काही नवीन समजते काय, हे पाहणे उत्सुकतेचे राहील.

 

लेखिका: शीतल दरंदळे