धोनीलाही जे जमलं नाही ते रिषभ पंतने करून दाखवलं...त्याने कोणता इतिहास घडवलाय?

लिस्टिकल
धोनीलाही जे जमलं नाही ते रिषभ पंतने करून दाखवलं...त्याने कोणता इतिहास घडवलाय?

सध्या टी ट्वेन्टीचा हंगाम सुरू आहे. आयपीएलचा थरार अर्ध्यात थंडावला असला तरी काही दिवसांनी टी ट्वेन्टी वर्ल्डकप सुरू होईल. पण यादरम्यान कसोटी क्रिकेटमधील खेळाडूंची क्रमवारी आयसीसीने जाहीर केली आहे. या क्रमवारीत एका भारतीय खेळाडूने इतिहास घडवला आहे.

धोनीचा शिष्य रिषभ पंत पुढे जाऊन धोनीची जागा घेईल या बद्दल अनेकांचे एकमत आहे. लोकांच्या अपेक्षा खोट्या नाहीत हे त्याने धोनीलाही आजवर जे जमले नाही ते करून दाखवत सिद्ध केले आहे. आयसीसीच्या टेस्ट रँकिंगमध्ये तो 6 व्या स्थानी आला आहे. हा पराक्रम करणारा तो भारताच्या इतिहासातील पहिला विकेट किपर आहे.

आजवर टॉप १० मध्ये सुद्धा एकही भारतीय विकेटकिपर येऊ शकला नव्हता. रिषभ पंत हा भन्नाट खेळाडू आहे हे एव्हाना लोकांना समजून आले आहे. गेल्या काही दिवसांत त्याने भारतीय संघासाठी बॅटिंग आणि विकेटकिपिंग अशा दोन्ही बाजूने योगदान दिले आहे. सध्या त्याचे ७४७ गुण आयसीसी रँकिंगमध्ये झाले आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गेलेल्या भारतीय संघासाठी त्याने मॅच विनिंग खेळी केली. त्यानंतर त्याचा भाव देखील वधारला आहे. सध्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये न्यूझीलँडचा कॅप्टन केन विल्यमसन पहिल्या स्थानी आहे. विल्यमसन हा तब्बल ९१९ गुण मिळवत यादीत अव्वल स्थानी आहे, तर भारताचा विराट कोहली हा ८१४ गुण मिळवून ५ व्या स्थानी आहे.

रोहित शर्मा हा देखील पंतसोबत ६व्या स्थानी विराजमान आहे. सध्या ६व्या स्थानी भारताचे रोहित शर्मा, रिषभ पंत आणि न्यूझीलँडचा हेन्री निकोलस हे ७४७ गुण मिळवत ६व्या स्थानी आहेत. आता यांच्यापैकी सर्वात आधी कोण पुढे सरकत ५वा क्रमांक मिळवतो हे येत्या काळात दिसेलच.

पण रिषभ पंतने आपल्या सातत्यपूर्ण खेळीने मात्र भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. येत्या काळात त्याचा खेळ अधिक बहरून आला तर राष्ट्रीय संघाला ऐनवेळी तारणारा संकटमोचक मिळाला हे समजायला जागा हरकत नाही.

टॅग्स:

cricketdhoni

संबंधित लेख