जगभर पसरलेल्या प्रचंड कर्तृत्व आणि यशाचे धनी असलेल्या लोकांच्या यशामागे त्यांची मेहनत, हुशारी, व्यवहारी स्वभाव अशा अनेक गोष्टी असतात. या यशस्वी लोकांचा यशस्वी होण्यामागील प्रवास आपण नेहमी प्रेरणादायी म्हणून वाचत ऐकत असतो. पण अनेक यशस्वी लोकांमध्ये एक महत्वाची गोष्ट दिसून येते ती म्हणजे त्यांना संधी मिळते आणि ते मिळालेल्या संधीचे सोनेही करतात. सगळ्यांनाच संधी मिळते असेही नाही आणि संधी मिळाली तरी तिचं काय करायचं हे ही काहींना उमगत नाही.
अनेक यशस्वी लोकांमध्ये हो गोष्ट दिसून येते. मिळालेली संधी भविष्याचा अंदाज घेऊन स्वीकारणे आणि त्या संधीतून हळूहळू करत मोठे साम्राज्य उभारणे सगळ्यांना जमत नाही. ज्यांना जमते ते यशस्वी म्हणून मोजले जातात.
बिल गेट्स हा जगातील कित्येक वर्ष सर्वाधिक श्रीमंत राहिलेला माणूस आहे. मायक्रोसॉफ्ट ही त्याची कंपनी आजही अब्जावधी रुपयांचा टर्नओव्हर करत असते. आजवर बिल गेट्सच्या अनेक यशस्वी गोष्टी तुम्ही वाचल्या-ऐकल्या असतील. मात्र आज त्याला मिळालेली संधी आणि त्या संधीचे त्याने कसे सोने केले ही गोष्ट तुम्ही वाचणार आहोत.
बिलचा जन्म १९५५ सालचा. बिल आठवीत गेला. तोवर इतर मुलांसारखे त्याचे आयुष्य सुरू होते. पण १९६८ साली त्याला लेकसाईड स्कुल या शाळेत टाकण्यात आले. तर योगायोगाची मालिका इथून सुरू होते. ही अशी शाळा होती जिथे कॉम्प्युटर्स होते. तो काळ असा आहे की, त्या काळात अगदीच एखाद-दुसऱ्या शाळेत कॉम्प्युटर होते. अगदी मोठया विद्यापीठांमध्ये पण तेव्हा कॉम्प्युटर्स असायचेच असे नाही.

