केरळच्या या ७१ वर्षांच्या आजीबाईंकडे जेसीबी, क्रेन, बस अशी ११ प्रकारची वाहने चालवण्याचा परवाना आहे! करतात तरी काय या?

लिस्टिकल
केरळच्या या ७१ वर्षांच्या आजीबाईंकडे जेसीबी, क्रेन, बस अशी ११ प्रकारची वाहने चालवण्याचा परवाना आहे! करतात तरी काय या?

आज कितीही आधुनिक झालो तरी वाहन चालवायची मक्तेदारी ही पुरुषांची आहे असे मानले जाते. स्त्रियांच्या गाडी चालवण्यारून आजही जोक फिरतात. पण खरेतर जगात लांब पल्ल्याचा प्रवास करणारी ही स्त्रीच होती. [ महिला चालकांना कितीही नावं ठेवा, पण या बाईंमुळेच आज आपण कार चालवत आहोत.. 

महिला चालकांना कितीही नावं ठेवा, पण या बाईंमुळेच आज आपण कार चालवत आहोत...

हे झालं जुनं. पण आज आम्ही अश्या अम्मांची कहाणी सांगणार आहोत ज्या ७१ वर्षाच्या असूनही रोड रोलर्सपासून ट्रॅक्टरपर्यंत सर्व काही कुशलतेने चालवू शकतात. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे वाहन चालवायचे चक्क ११ परवाने आहेत. त्या आजही त्यांचे ड्रायव्हिंग स्कूल कोचीमध्ये चालवतात. हेच नाही, तर या वयातही त्या न थकता वाहन चालवतात. आपण त्यांची प्रेरणादायी कहाणी वाचूयात.

केरळमधील कोची येथील थोपूमपाडी येथे राहणाऱ्या जे. राधामणींना प्रेमाने 'मनियम्मा' म्हणतात. राधामणी या जड वाहनाचा परवाना मिळवणाऱ्या केरळमधील पहिल्या महिला आहेत. त्या अवघ्या १७ वर्षाच्या होत्या तेव्हा लग्न करून कोचीतल्या थोपूमपाडी येथे आपल्या पतीसोबत आल्या. त्या तेव्हा दहावीसुद्धा झाल्या नव्हत्या. लग्न झाल्यावर १० वी चा निकाल लागला. त्यांना तेव्हा सायकल ही येत नव्हती . त्या काळी महिलांनी गावात सायकल चालवणे सामान्य नव्हते. तसेच साडीत ती शिकणे सुद्धा सोपे नव्हते. पण त्यांच्या पतीने त्यांना साथ दिली. त्या पहिले वाहन शिकल्या ते म्हणजे कार !

त्यांनी १९७० च्या दशकात थप्पुमपाडी येथे AZ ड्रायव्हिंग स्कूल सुरू केले. पतीला साथ देत ते उत्तम चालू होते. ड्रायव्हिंग स्कूल चालवायचे असल्यास, मालकांकडेही सर्व वाहनांचे परवाने असणे अनिवार्य असते. त्यामुळे त्या एक एक वाहन शिकू लागल्या. त्यांना वाहन चालवायची आवड होतीच. १९८८ मध्ये त्यांना बस आणि लॉरी ही दोन्ही वाहने चालवली. पहिल्यांदा थप्पुमपाडी ते चेरथला हे ३३ किमीचे अंतर त्यांनी बस चालवून पार केले. त्यांचे कौशल्य पाहून त्यांना लगेच परवाना मिळाला. त्यानंतर त्या रोड रोलर, ट्रॅक्टर, ट्रेलर कंटेनर, लॉरी , बस, क्रेन, , फोर्क लिफ्ट, रोड रोलर, जेसीबी हेही शिकल्या.

सगळ व्यवस्थित चालू असताना २००४ मध्ये पतीचे निधन झाले आणि एक मोठे संकट त्यांच्या कुटुंबावर आले. दोन मुले पदरात असल्यामुळे त्या खचल्या नाहीत. मुलांसोबत ड्रायव्हिंग स्कूल मोठ्या जिद्दीने पुढे नेले आणि आज सर्व कोचीत त्यांची ओळख आहे.

खरंच राधामणी यांचा प्रेरणादायी प्रवास नव्या पिढीला प्रेरणा देईल हे नक्की.

शीतल दरंदळे